अंबाजोगाई - रामनवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान महिना असे सणासुदीचे दिवस सुरु असताना मागील आठवड्यापासून अंबाजोगाई आणि केज तालुक्यात आपत्कालीन भारनियमन सुरु करण्यात आले. उन्हामुळे असह्य उकाडा आणि अनियंत्रित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त आहेत. कुठलेही वेळापत्रक न देता दिवसातून आठ ते दहा तासांचे भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे केज मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी बुधवारी (दि.१३) अंबाजोगाई येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांचे कार्यालय गाठले आणि जाब विचारला. वसुलीचे प्रमाण चांगले आणि वीजचोरी कमी असलेल्या ठिकाणी भारनियमन करण्यात येणार नाही अशी ग्वाही यावेळी कार्यकारी अभियंत्यांनी दिली.
वीज उत्पादनात तुट निर्माण झाल्याचे कारण पुढे करत आठ दिवसापूर्वी महावितरणकडून आपत्कालीन भारनियमन सुरु करण्यात आले. या भारनियमनाला कसलेही वेळापत्रक नाही. रात्री-अपरात्री, पहाटे, दुपारी अशी कोणत्याही वीजपुरवठा खंडित केला जातो. दिवसभरात एकूण आठ ते दहा तास भारनियमन केले जाते. आधीच वाढलेल्या तापमानामुळे असह्य उकाडा आणि त्यात नियोजनशून्य भारनियमन यामुळे महिला, बालकांसह व्यापारी, शेतकरी सर्वच हवालदिल आहेत. पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अंबाजोगाई, केज वगळता शेजारच्या काही तालुक्यात आणि लातूरसारख्या जिल्ह्यात मात्र एवढे तुघलकी आपत्कालीन भारनियमन नाही. त्यामुळे महावितरण विरोधात रोष वाढलेला आहे.
याच पार्श्वभूमीवर आ. नमिता मुंदडा यांनी कार्यकारी अभियंता जितेंद्र वाघमारे यांच्या कार्यालयात जाऊन जाब विचारला. अंबाजोगाई, केज या शहरातील नागरिकांनी महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत ९५% वीजबिलांची वसुली दिली, तसेच या दोन्ही ठिकाणी वीजचोरीचे प्रमाण नगण्य आहे. जिथे वसुली चांगली आणि वीजचोरी नसते त्या ठिकाणी भारनियमन करू नये असे निर्देश असतानाही या दोन शहरांना का वेठीस धरले जात आहे असा सवाल आ. मुंदडा यांनी केला. तसेच झाडांच्या फांद्या, तारांचे झोळ यामुळेही वीजपुरवठ्यात व्यत्यय येतो. शेतीपंपाला आठ तास वीज पुरवठा देण्याचे निर्देश आहेत, मात्र नेमके त्याच वेळी लोडशेडींग करण्यात येते. त्यामुळे शेतीपंपाला अवघे २-३ तास वीज मिळत आहे याबाबतही आ. मुंदडा यांनी जाब विचारला. यावर वसुलीचे प्रमाण चांगले आणि वीजचोरी कमी असलेल्या ठिकाणी भारनियमन करण्यात येणार नाही अशी ग्वाही यावेळी कार्यकारी अभियंता वाघमारे यांनी दिली.