कडा - सध्या कोरोना महामारीचे दिवस असल्याने शासनाने सर्वसामान्य जनतेची उपासमार होऊ नये म्हणून दरमहा वाढीव धान्य पुरवठा विभागाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना दिले जाते. असे असले तरी हे खरचं गरजवंत लोकांना मिळत नाही. चक्क त्याच्यावर टपून बसलेल्या धान्य माफियांची अफलातून शक्कल लढवून त्याचा काळा बाजार होत असल्याचा प्रकार आष्टी तालुक्यात उघडकीस आला आहे.
एवढेच नव्हे या शासकीय धान्याचे लोकेशन हे परजिल्ह्यात होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
नेकनूर येथून एक आयसर टेम्पो चालक कडधान्याने भरलेले कट्टे आजूबाजूने लावून त्यामध्ये रेशनचा गहू व तांदूळ लपवून त्याची बीड जिल्ह्यातून नगर जिल्ह्यात विक्री करण्यासाठी टेम्पो क्रमांक ( MH 16, AE 9616) मध्ये घेऊन रविवारी मध्यरात्री जामखेड मार्गे नगरला जात असताना आष्टी पोलिसांनी ताब्यात घेऊन पंचनाम्यासाठी महसूल विभागाच्या स्वाधीन केले होते. त्यात चिंच ५ कट्टे, एरंड १४ कट्टे ,बाजरी १० कट्टे, ज्वारी १८ कट्टे, हरभरा ३४ कट्टे, तूर १३ कट्टे, मटकी २ कट्टे, गहू ११ कट्टे, तांदूळ ७७ कट्टे, असे एकूण १८४ कट्टे वजन १०५ क्विंटल असा माल आढळून आल्याने आष्टी पोलिसांनी त्या टेम्पो चालकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. पण बीड जिल्ह्यात धान्याचा काळाबाजार होत असताना जिल्ह्यातील पुरवठा विभागाचे अधिकारी नेमकं करतात काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याबाबत आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक व तपास अधिकारी प्रमोद काळे म्हणाले की, याप्रकरणी सखोल चौकशी करून तो माल काेठून आला? त्याचा मालक याचे पाळेमुळे शोधून लवकरच यातील सत्य समोर येईल असे त्यांनी लोकमतला सांगितले.
बीड जिल्ह्यातील धान्य माफियाचे नगर लोकेशन
बीड जिल्ह्यात अनेक तालुक्यात रेशनच्या धान्याचा काळाबाजार होताना दिसत आहे. या अगोदर देखील अनेक वेळा धान्य पकडले असून देखील हे कुठे थांबत नाही. गोरगरीब जनतेच्या धान्यावर गलेलठ्ठ होत असलेल्या धान्य माफियाचे नगर लोकेशन असून पुरवठा विभागातील अधिकारी,कर्मचारी नेमकं करतात काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.