जालना : येथील गजकेसरी स्टील कंपनीत झालेल्या भीषण स्फोटामुळे तप्त लोहरस अंगावर पडल्याने सात कामगार गंभीर जखमी झाले होते. त्यातील तीन गंभीर जखमींचा छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला. या घटनेतील मयतांची संख्या पाचवर गेली आहे.
जालना येथील गजकेसरी स्टील कंपनीत शनिवारी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला होता. त्यावेळी लोखंड वितळविणाऱ्या भट्टीतील तप्त लोहरस अंगावर पडल्याने ३४ कामगार भाजले होते. त्यातील गंभीर जखमी असलेल्या सातजणांना छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
परंतु, उपचार सुरू असताना रविवारी रामश्रेष्ठ राम बबहु राम (वय ४५, रा. सलीमपूर बिहार) या कामगाराचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कृष्णा श्रीकांत यादव (वय ३५, रा. मोहम्मदपूर सलाई हरदोपट्टी बलिया गडमलपूर, उत्तर प्रदेश) या कामगाराचा मृत्यू झाला होता, तर बुधवारी पिंटूवास भिस्तम भैष्णव जेना (वय ४० रा. बगाराम पी. एस. आगरवाडा जिल्हा भद्रक, ओडिशा), रामदयाल रामनाथ धुर्वे (वय २२, रा. कुचरबोह वडगाव बैतूल मध्य प्रदेश) रंजीत सुभाष प्रजापती (वय २८, रा. रावळ पोस्ट सैदपूर जिल्हा गाजीपूर, उत्तर प्रदेश) या तिघांचा मृत्यू झाला आहे. गजकेसरी स्टील कंपनीतील स्फोटाच्या घटनेत आजवर पाचजणांचा मृत्यू झाला असून, इतर दोन गंभीर जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.