संजय खाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : तालुक्यातील दाऊतपूर येथील तळ्यातून बेकायदेशीर राख उपसा चालूच आहे. कोरोनाचे संकट सुरू आहे. त्यातच राखेचे प्रचंड प्रमाणात होणारे प्रदूषण फप्फुसाला हानिकारक ठरत आहे. त्यामुळे तालुक्यातील दादाहरी वडगावचे ग्रामस्थ हैराण झाले आहे. दरम्यान, संतप्त ग्रामस्थांनी शनिवारी रात्री ११ वाजता परळी-गंगाखेड रस्त्यावर उतरून याविरोधात रास्ता रोको केला.
परळी येथील औष्णिक वीज प्रकल्पाची दाऊतपूर येथील तळ्यातील राखेची वाहतूक बंद आहे. तरीही छोटे-मोठे राख वाहतूकदार ती राख बेकायदेशीरपणे उचलतात. अवैध वाहतूक व साठवणूक करताना सर्व नियम धाब्यावर बसवले जात असल्याने मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. वादळ वा-याने ही राख दाऊतपूर, दादाहरी वडगाव येथील लोकांच्या घराघरात पसरत आहे, परिणामी त्यांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.
राखेची अवैध वाहतूक करणाऱ्या एका ट्रकने विजेच्या खांबाला धडक दिल्याने तारा तुटल्या. परिणामी संपूर्ण गाव तीन दिवसांपासून अंधारात होते. अगोदरच कोरोना. त्यात प्रचंड उकाडा. घरात अंधार आणि राखेचे प्रदूषण यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी शनिवारी रात्रीच परळी-गंगाखेड रस्त्यावर आंदोलन सुरू केले. ही बाब भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना समजताच त्यांनी मध्यरात्री डीवायएसपी तसेच तहसीलदारांना दूरध्वनीवरून माहिती दिली. त्यानंतर प्रशासन हलले. त्यानंतर लगेच वीजपुरवठा सुरळीत झाला. राख उपसाप्रकरणी कारवाई करण्याचे तहसीलदारांनी आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला.
....
राखेच्या प्रदूषणप्रकरणी काही दिवसांपूर्वी रास्ता रोको केला होता. त्यानंतर राखेची वाहतूक बंद करण्यात आली होती. परंतु ती पुन्हा चालू करण्यात आली आहे. प्रशासनाचे कसलेच नियंत्रण नाही. वाहतुकीचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत. लोकांच्या जिवाशी खेळ चालू आहे. याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे.
- शिवाजी शिंदे, माजी सरपंच, दादाहरी वडगाव
....
दाऊतपूर येथील राख बंधाऱ्यावरील राख उपसा करण्यास व वाहतूक करण्यास विद्युत केंद्र प्रशासनाने बंदी घातली आहे. बेकायदेशीर राख वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनास दिल्या आहेत.
-मोहन आव्हाड, मुख्य अभियंता, परळी औष्णिक विद्युत केंद्र
....