कडा(बीड): मानसिक त्रासाला कंटाळून घरातून बेपत्ता झालेल्या विवाहितेचा तीन दिवसांनी विहिरीत मृतदेह आढळून आल्याची घटना बुधवारी घडली होती. या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासुरवाडीच्या तिघांना राहत्या घरातून अटक करण्यात आली. तर सासू फरार झाली आहे. कोमल श्रीकांत राऊत वय वर्ष २५ असे मयत विवाहितेचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील साबलखेड येथील माहेर असलेल्या कोमल हिचा धामणगांव येथील श्रीकांत कल्याण राऊत याच्याशी विवाह झाला होता.काही वर्ष सुखाचा संसार चालला असताना कोमलला पती,सासरा,साहू,दीर मानसिक त्रास देऊन तिचा छळ करत होते. हा प्रकार सहन न झाल्याने २६ नोव्हेंबर रोजी कोमल बेपत्ता झाली. त्यानंतर २९ नोव्हेंबर रोजी घरालगतच्या राऊत कुटुंबाच्या मालकीच्या विहिरीत कोमलचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली.
दरम्यान,मृत कोमलच्या माहेरीच्या नातेवाइकांनी घातपाताचा संशय घेत पोलिसात तक्रार दिली. आई लक्ष्मी जयराम गायकवाड यांच्या फिर्यादीवरून पती श्रीकांत कल्याण राऊत, सासरा कल्याण विठ्ठल राऊत, सासू आशाबाई कल्याण राऊत, दीर निलेश कल्याण राऊत यांच्या विरोधात अंभोरा पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सासरा,पती,दीर यांना राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली. तर सासू आशाबाई फरार आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवि देशमाने करीत आहेत.