अंबाजोगाई : शहरापासून जवळच आडस रोडवरील शेतातील झुडुपात एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठवून दिला. सदरील मृत महिला चनई येथील असून तिचा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी एका संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे.
सरूबाई हरिभाऊ वारकड (वय ६०, रा. चनई, ता. अंबाजोगाई) असे त्या मृत महिलेचे नाव आहे. सरूबाई यांची शेतजमीन गावापासून अंदाजे तीन-चार किमी अंतरावर आहे. त्या दररोज शेतात जात असत. मात्र, चार दिवसापूर्वी शेतात गेल्यानंतर त्या घरी परतल्या नव्हत्या. त्यामुळे नातेवाईकांनी त्या बेपत्ता झाल्याची माहिती देण्यासाठी शुक्रवारी (दि.१९) सकाळी अंबाजोगाई शहर ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलीस निरिक्षक बाळासाहेब पवार यांच्या सूचनेवरून उपनिरिक्षक गोपाळ सूर्यवंशी यांनी चौकशी केली असता त्यांना सरूबाईचा मृतदेह चनईपासून चार किमी अंतरावर आडस रोडवरील शेतात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी शेतात जाऊन पाहणी केली असता एका शेळीपालन फार्म जवळ झुडुपाच्या खाली सरूबाई यांचा मृतदेह आढळून आला. प्रथमदर्शनी हा खुनाचा प्रकार असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठवून दिला . शनिवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतरच सरूबाईचा मृत्यू कशाने झाला हे स्पष्ट होऊ शकणार आहे.
कुटुंबियांवर संशय?मयत सरूबाई या मुलगा, सून आणि नातवासह चनईत राहत होत्या. शेतात गेलेल्या सरूबाई चार दिवसापासून घरी परतल्या नसूनही त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना कळवले नव्हते. अखेर सरूबाई यांचा संपर्क होत नसल्याने नातेवाईकांना संशय आला आणि बेपत्ताची तक्रार नोंदवण्यासाठी ते पोलीस ठाण्यात गेले. त्यानंतर चौकशीतून पोलिसांचा सरूबाई यांच्या कुटुंबीयांवर संशय बळावला असून पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे.