बीड : शहरातील विविध भागात सध्या रस्ता, नालीचे काम होत आहे. परंतु ते अंदाजपत्रकानुसार न करता बोगस पद्धतीने केल्याचे उघड होत आहे. याच कामांची नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी पाहणी करून नागरिकांच्या मदतीने सूचना केल्या. तसेच नागरिकांनीही ही कामे दर्जेदार पद्धतीने करून घ्यावीत, असेही नाईकवाडे यांनी सांगितले.
बीड शहरातील वेगवेगळ्या भागात सध्या सिमेंट काँक्रीटची रस्ता कामे सुरू आहेत. याचीच पाहणी नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी बुधवारी केली. यात संभाजीनगर भागात लोखंडी चॅनल लावून रस्ता सिमेंट काँक्रीटने भरणे अपेक्षित असताना चॅनल शिवाय रस्ता काम चालू होते. काझी नगर भागात अंदाज पत्रकाप्रमाणे खडीकरणाचे काम दिसून आले नाही. तसेच रोड क्रॉसिंगमध्ये तुटलेले सिमेंट पाईप वापरण्यात आले होते. ते काढून तेथे नाली बांधून त्यावर स्लॅब टाकण्यासंदर्भात सांगण्यात आले. त्यानंतर एनके कॉलनीतही अशीच परिस्थिती होती. रविराज मंगल कार्यालय समोर व मसरत नगर भागात पंधरा दिवसापूर्वी केलेल्या रस्ता कामांची पाहणी केली असता तेथे पाण्याचे डबके साचल्याचे आढळून आले.