बीड : बाहेरच्या जिल्ह्यातील काही लोकांनी शेतकरी असल्याचे भासवीत बीड जिल्ह्यात एकूण २९ हजार ८१० एकरचा पीक विमा उतरविल्याचे समोर आले आहे. अनधिकृत पद्धतीने पीक विमा भरणाऱ्या ६० जणांची नावे, आधार कार्ड, बँक खाते नंबर उपलब्ध असताना ही अशा लोकांवर गुन्हे का दाखल केले जात नाहीत ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. बोगस पद्धतीने विमा भरणाऱ्यांमुळे जिल्ह्यातील खऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होण्याची भीती व्यक्त होत आहे.
अनधिकृरीत्या पीक विमा भरून ६४ कोटी रुपये लाटण्याचा डाव वेळीच लक्षात आल्यामुळे शासनाचा हा पैसा वाचला आहे. ही बाब स्तुत्य असली तरी हा गैरप्रकार आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तींवर कारवाई करणे आवश्यक आहे, तसेच मागच्या तीन वर्षांत वाटप केलेल्या पीक विमा लाभार्थ्यांची यादी तपासून त्यामध्ये आता समोर आलेल्या ६० लोकांची नावे आहे का, ते तपासणेही आवश्यक आहे. शेतकरी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या क्षेत्रापेक्षा थोडे जास्त क्षेत्र दाखवून विमा भरणे एक वेळा समजून घेता येईल; परंतु शेती नाही, पीक लागवड नाही तरीही हजारो एकरचा विमा उतरवून त्याचा लाभ घेण्याचा हा प्रकार खऱ्या व मेहनती शेतकऱ्यांची प्रतिमा खराब करणारा आहे. त्यामुळे बोगस पीक विमा भरणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते, तसेच शेतकरी नेत्यांतून होत आहे. दरम्यान, बोगस विमा भरणाऱ्यांवर कारवाई संदर्भाने माहिती घेण्यासाठी विमा अधिकाऱ्यांना मोबाइल कॉल केला असता त्यांनी कॉल उचलला नसल्याने त्यांची बाजू समजू शकली नाही.
विमा देण्यास होऊ शकते टाळाटाळ ?कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोयाबीनच्या सर्व मंडळांना अग्रिम मंजूर झाला आहे. सोयाबीनसाठी ८७, मुगासाठी २२, तर उडदासाठी १३ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना विमा अग्रिम देण्याचे पीक विमा जिल्हास्तरीय संयुक्त समितीने मंजूर केले आहे; परंतु बोगस विमा भरल्याचे प्रकरण समोर आल्यामुळे आता विमा अग्रिम देण्याबाबत पीक विमा कंपनीकडून याच आधारावर टाळाटाळ केली जाऊ शकते. त्यामुळे बोगस विमा भरलेल्यांवर कारवाई आवश्यक आहे.
रॅकेटचा संशय
बाहेर जिल्ह्यातील काही निवडक लोकांनी शेत नसतानाही पीक विमा भरला आहे. हे एक रॅकेट असू शकते. अनधिकृतरीत्या विमा भरणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल केले पाहिजेत. गुन्हे दाखल झाल्यानंतर चौकशीत सर्व काही समोर येईलच. शिवाय इतर कोणी असा प्रकार करणार नाही.
-संतोष जाधव, शिवसेना नेते, बीड
...तर विमाच रद्द होतोसीएससी सेंटर चालक शेतकऱ्यांचा पीक विमा भरतात. नजर चुकीने त्यांच्याकडून किंवा शेतकऱ्यांकडून अर्ज भरताना प्रत्यक्ष क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्राचा विमा भरला तर आताच त्यासाठी पीक विमा कंपनीकडे अर्ज करू शकतात. क्षेत्र दुरुस्त केले जात नाही, जास्तीचे क्षेत्र कमी करण्यासाठीचा अर्ज आल्यास पीक विमाच रद्द होतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, एका शेतकऱ्याच्या जागेवर दुसऱ्याचा सातबारा जोडला गेला असेल तर तो रद्द करण्यासाठी अर्ज प्राप्त होत असल्याचे ही ते म्हणाले.