नितीन कांबळे
कडा : बोगस डॉक्टरांवर कारवाया करण्यासाठी नियुक्त केलेल्या समित्या कागदावरच आहेत. तक्रार नसल्याने आणि कोरोनाचे कारण सांगत या मुन्नाभाईंना अप्रत्यक्ष अभय मिळत असल्याचे दिसत आहे. मागील वर्षभरात केवळ दोन कारवाया झाल्याची नोंद आरोग्य विभागात आहे.
वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांकडे महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९३१ च्या कलम ३३(१) नुसार डाॅक्टरांनी संबंधित परिषदेकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार ॲलोपॅथी व्यावसायिकांसाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल, आयुर्वेदिक व्यावसायिकांसाठी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन, होमिओपॅथिकसाठी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ व दंत चिकित्सेसाठी महाराष्ट्र स्टेट डेंटिस्ट कौन्सिलकडे नोदणी करणे आवश्यक असते. चारपैकी कोणत्याही एका संस्थेकडे नोदणी नसणाऱ्यांना वैद्यकीय व्यवसाय करता येत नाही. असे असताना मात्र जिल्ह्यात सर्वत्र मुन्नाभाईंनी आपली दुकाने थाटल्याचे दिसत आहे. याची तपासणी करून कारवाई करावी, अशी मागणी सामान्यांमधून जोर धरू लागली आहे.
तालुकास्तरावरील समितीत यांचा समावेश
तालुक्यात बोगस डॉक्टर असतील तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या समितीत तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, संबंधित आरोग्य केंद्राचा वैद्यकीय अधिकारी, नायब तहसीलदार, पंचायत समितीतील आरोग्य विभागाचे विस्तार अधिकारी, पोलीस निरीक्षक अथवा पोलीस उपनिरीक्षक यांचा समितीत समावेश असतो.
नियम काय सांगतो
ज्या डाॅक्टरांकडे ॲलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी आदी कोणत्याही मान्यताप्राप्त पॅथीचे रजिस्ट्रेशन नसतानाही तो वैद्यकीय व्यवसाय करत असतील तर त्याच्यावर कारवाई करण्यात येते. महाराष्ट्र वैद्यक व्यावसायिक अधिनियम १९६१ मधील कलम ३३ अ (१)नुसार अशा पहिल्या अपराधासाठी २ वर्षांपेक्षा जास्त, परंतु ५ वर्षांपर्यंतच्या सश्रम कारावासाची आणि २ ते १० हजारांपर्यंत दंड, दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या अपराधासाठी दहा वर्षांपर्यंत कारावासाची आणि २५ हजारापर्यंत दंडाची शिक्षा लागू असल्याचा नियम सांगतो.
---
बोगस डॉक्टर असतील तर त्याची लेखी तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली तर कारवाई करता येईल.
- डॉ. जयश्री शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी, आष्टी
--
वर्षभरात झालेल्या कारवाया - २
१ मोगरा ता.माजलगाव
२ केकतपांगरी ता.गेवराई