बीड : केंद्रीय अर्थ संकल्पानंतर महागाईचा भडका आणखी उडाला आहे. घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे दर तब्बल २५ रुपयांनी वाढले आहेत. तर पेट्रोल आणि डिझेल कोणत्याही क्षणी १०० रुपयाच्या पार होऊ शकते. कोरोनाच्या कहरामुळे अगोदरच जनता हैराण असताना आता केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये कायम दरवाढ करण्याचे धोरण आखले आहे. केंद्र सरकारच्या या धोरणा विरुध्द आणि महागाईच्या या भडकणाऱ्या वणव्यातून सर्वसामान्यांना बाहेर काढण्यासाठी ५ फेब्रुवारी बीडसह जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी सायकल मार्च काढून आता केवळ सायकलनेच फिरायचे का? असा प्रश्न विचारत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. पेट्रोल आणि डिझेल ही होणारी दरवाढ सर्वसामान्यांना आवाक्याबाहेर आहे. गेल्या आठ महिन्यापासून सुरु असलेल्या कोरोनाच्या कहरामुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे अगोदर मोडलेले असताना भाजप प्रणित केंद्र सरकार कडून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये दिवसेंदिवस वाढ करण्यात येत आहे. जगात सर्वाधिक पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे भारतात आहेत मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर सतत पेट्रोल, डिझेलची दरवाढ सुरुच आहे. याचा निषेध करण्यासाठी ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या नेतृत्वाखाली नगर नाका रोड बीड येथील चौकात ठिय्या आंदोलन तसेच सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख अॅड.संगिता चव्हाण, वैजीनाथ तांदळे, बंडू पिंगळे, हनुमान जगताप, आशिष मस्के, उपजिल्हाप्रमुख सुशिल पिंगळे, भीमराव वाघचौरे, नितीन धांडे, गोरख सिंघन, बप्पा घुगे, राजेंद्र राऊत, सुरवसे, अर्जुन नलावडे, हनुमानप्रसाद पांडे, सखाराम देवकर, परमेश्वर डाके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.