अनिल भंडारी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : यंदा दमदार पाऊस झाल्याने पांढ-या सोन्याचे पीक जोमात येईल अशी आशा लावून बसलेल्या शेतकºयांचा सैंद्रिय बोंडअळीने भ्रमनिरास केला आहे. जिल्ह्यात ४० टक्के कापसाला फटका बसला असून कृषी विभागाच्या प्रारंभिक सर्वेक्षणातही ही बाब पुढे आली आहे. कर्जमाफीच्या प्रतीक्षेतील शेतक-यांना कापसानेही दगा दिल्याने ते पुरते बेजार झाले आहेत.
जिल्ह्यात ३ लाख ६१ हजार ६५५ हेक्टरवर कापूस लागवड झाली. सुरुवातीला पावसाने चांगली हजेरी लावली. नंतर मात्र ३० पेक्षा जास्त दिवसांचा खंड झाला. त्यामुळे कापूस उत्पादक हवालदिल झाले होते. हातची पिके जाण्याची भिती निर्माण झाली होती. त्यांनतर जोरदार पावसाने हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले. शेतक-यांच्या जीवात जीव आला.
परंतु, परतीच्या पावसाने कापसाच्या वाती केल्या. यातच सैंद्रिय बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रदुर्भाव झाल्याने कापूस उत्पादनात घटीची चिन्हे दिसू लागली. पहिल्या वेचणीतच अळीच्या प्रादुर्भावामुळे कापसाच्या पिकाला फटका बसला. काही ठिकाणी तर कपाशीच्या शेतात रुटर फिरविले जात आहेत. एका बॅगला दीड क्विंटल एवढाच उतारा मिळाल्याचे केज तालुक्यातील शेतकरी सांगत आहेत. इतरत्रही तसाच अनुभव शेतक-यांना येत आहेत. हाती आलेले पीक गेल्याने भ्रमनिरास झालेल्या शेतक-यांनी कापूस उपटण्यास सुरुवात केली आहे.
फरतड कापसाचा परिणामवेचणीनंतर फरतड कापूस घेणा-या शेतक-यांचे प्रमाण जास्त आहे. हा फरतड कापूसच कापसाला धोका ठरला आहे. मागील वर्षी कापूस उत्पादनात वाढ झाली होती. मात्र, फरतड कापसामुळे बोंडअळीची साखळी वाढत गेली. त्याचा विपरित परिणाम यावर्षी कापसावर झाल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांगतिले.