लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : शहरातील अरुणोदय मार्केटमधील चार दुकानांचे खरेदी खत करून ३१ लक्ष रुपये घेऊन दुकाने न देता गंडविणाऱ्या दोघा जणांना परळी शहर पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. बालकिशन मुरलीधर बाहेती, श्रीकिशन मुरलीधर बाहेती असे आरोपीचे नाव आहे, बालकिशन यास औरंगाबाद येथे तर श्रीकिशन यास पुण्यात ताब्यात घेतले आहे.राजेश झंवर यांनी फसवणुकीची तक्रार परळी शहर पोलीस ठाण्यात गेल्या महिन्यात दिली होती. बाहेती बंधू विरोधात आणखी तिघांनी दिलेल्या तक्रारीवरून फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. बालकिशन मुरलीधर बाहेती, श्रीकिशन मुरलीधर बाहेती, दीपक बालकिशन बाहेती (रा. प्रेमपन्ना नगर, परळी) यांनी शहरातील अरुणोदय मार्केटमधील दुकाने विकत घेऊन गजानन जनरल स्टोअर्स काही वर्षांपूर्वी सुरू केले आणि याच ठिकाणी असलेले चार दुकाने विकत देतो म्हणून नोटरी करून दिली. झंवर यांना दुकाने न देताच फसवणूक करून परळीतून पलायन केले. चार दुकाने ६१ लाखात ठरली होती. त्या पोटी ३१ लाख इसार पावती करून दिले होते. हीच दुकाने एका बँकेला मॉडगेज करून दिलेली आहेत, अशी तक्रार राजेश झंवर यांनी दिली. राजेश झंवर यांच्या फिर्यादीवरून बालकिशन बाहेती, श्रीकिशन बाहेती, दीपक बाहेती यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन दोघांना अटक केली. शहर ठाण्याचे पो.नि. देविदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि कपिल बुद्धेवार, पोनि नवनाथ हरेगावकर यांनी ही कारवाई केली. फसवणूक प्रकरणी आणखी एक जण फरार आहे. अटक केलेल्या दोघांना २९ मे पर्यंत पोलीस कोठडीचे आदेश सुनावण्यात आले आहेत.१० कोटींचा आर्थिक फटका ?बाहेती बंधूंनी परळीत भिशीचा व्यवसाय चालू केला. त्यातून परळीकरांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर रक्कम लाभार्थ्यांना दिलीच नाही, पैसे देतो म्हणून फसवणूक केली आहे.अनेकांचे हातउसने पैसे ही घेऊन फसवणूक केली आहे. दहा कोटीच्या जवळपास आर्थिक फटका येथील विविध क्षेत्रातील व्यावसायिकांना बसला आहे.
३१ लाखांचा गंडा घालणारे दोघे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:37 AM