बीड : हळदी-कुंकवासाठी घराबाहेर पडलेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दुचाकीवरून येत लंपास करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. गुन्हे घडल्यानंतर ३० तासात ही कारवाई शुक्रवारी रात्री दरोडा प्रतिबंधक पथकाने पेठबीड भागात घडली.लखन किसन तुसांबड (३०) व बाबु विठ्ठल पवार (३० रा.वॉटरवेस, पेठबीड) अशी पकडलेल्या दोन्ही अट्टल गुन्हेगारांची नावे आहेत. १६ जानेवारी रोजी डॉ.ज्योती सुधीर राऊत (४१ रा.पांडुरंग नगर, बार्शी रोड, बीड) यांच्या गळ्यातील २८ हजार रूपयांचे तर रागिनी पांडुरंग बेदरे (रा.तिरूपती कॉलनी, बीड) यांच्या गळ्यातील सहा तोळ्याचे गंठन असा जवळपास दोन लाख रूपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले होते. दोन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी दुचाकीवरून येत अचानक दागिन्यांना हिसका मारत पळ काढला होता. तसेच प्राजक्ता दादासाहेब मुंडे नामक मुलीचा मोबाईलही लंपास केला होता. याप्रकरणी बीड शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ गस्त वाढविण्याबरोबरच तपासाला गती दिली. दरोडा प्रतिबंधक पथकाचे सपोनि गजानन जाधव यांना हे दोन आरोपी पेठ भागात वावरत असल्याची माहिती मिळाली. चौकशी केल्यानंतर त्यांनी तीनही गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांना बीड शहर पोलिसांच्या ताब्यात दिले असून दागिनेही हस्तगत केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडाचे सपोनि गजानन जाधव, मुंजाबा सौंदरमल, संजय खताळ, आर.बी.नागरगोजे, बबन राठोड, राहुल शिंदे, एच.एम.बांगर, अशोक दुबाले, भारत बंड, महेश चव्हाण, अंकुश दुधाळ, नारायण साबळे, माया साबळे आदींनी केली.
दुचाकीवरून महिलांचे दागिने लुटणारे दोघे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:46 AM
हळदी-कुंकवासाठी घराबाहेर पडलेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दुचाकीवरून येत लंपास करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
ठळक मुद्देतिन्ही गुन्ह्यांची कबुली : दरोडा प्रतिबंधक पथकाची यशस्वी कारवाई