बीड: गेवराई तालुक्यातील अर्धामसला गावातील धार्मिक स्थळात जिलेटिनचा स्फोट घडवून आणला. यातील दोन्ही आरोपी अटक आहेत. यावर बोलताना भाजप आ. सुरेश धस यांनी वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले ली. दोघेही आरोपी दारू प्यायलेले होते. त्यामुळे त्यांना सोडून द्या. यावरूनच मंगळवारी सोशल मीडियावर आ.धस यांच्याविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. ज्या संतोष देशमुखांसाठी आ.धस यांनी आवाज उठविला, त्याच धसांनी धार्मिक स्थळातील स्फोट प्रकरणातील आरोपींना सोडून द्या, असे वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
दरम्यान, बिश्नोई समाजाच्या काही लोकांना विमानाने मुंबई येथे आणण्यात आले. हरणाचे मांस खाल्ले आहे, असे सांगून माझ्या हत्येचा कट रचण्यात आला होता, असा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी प्रसिद्धी माध्यमास मुलाखतीच्या दरम्यान केला. आमदार धस यांनी आ.धनंजय मुंडे यांचे नाव न घेता गंभीर आरोप केला.
मला व्हिलन करण्याचा प्लॅनबीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून सुरू झालेला भाजप आमदार सुरेश धस विरुद्ध राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय संघर्ष सध्या तरी कायम आहे. सुरेश धस म्हणाले की, मला हरणाचे मांस खोक्याने पुरवले, असा आरोप करण्यात आला. ते म्हणाले की, आता माझ्यावर इतकी वाईट वेळ आलीय का? मुळात मी १६ वर्षे माळकरी राहिलेलो आहे. आता डॉक्टरांच्या सल्ल्याने मांसाहार करत असलो, तरी हरणाचे मांस खाण्यापर्यंत मी अजून गेलो नाही, पण माझ्यावर हरणाचे मांस खाल्ल्याचा आरोप करून नंतर त्यांनी बाहेरच्या राज्यातून विमानाचे तिकीट काढून बिश्नोई समाजाचे काही लोक मुंबईत आणले. याने हरणाचे मांस खाल्लेय, असे सांगत बिश्नोई समाजात मला व्हिलन करण्याचा त्यांचा प्लॅन होता. त्यातून लॉरेन्स बिश्नोईने माझी हत्या करावी, असा कट रचण्यात आला होता, असा खळबळजनक आरोप धस यांनी एका प्रसिद्धी माध्यमास दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
तुमच्यासोबत मैत्री काय कामाची?माझ्याबाबतीत इतक्या खालच्या पातळीवर तुम्ही जात असाल, तर तुमच्यासोबत मैत्री काय कामाची आहे? मला आयुष्यातून उठविण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. या कटात कोण-कोण सामील होतं, याची माहिती माझ्याकडे आहे. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना याबाबत माहिती देणार आहे, असेही सुरेश धस यांनी या मुलाखतीत सांगितले आहे. दरम्यान, आ.सुरेश धस यांनी केलेल्या या आरोपांवर आता आ.धनंजय मुंडे यांच्याकडून काही प्रत्युत्तर देण्यात येईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.