- अनिल भंडारी
बीड : तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कुर्ला येथील इयत्ता सातवीत शिकणाऱ्या बालवैज्ञानिक ओंकार अनिल शिंदे याने डोळ्यात पाणी न येता सराईतपणे कांदा कापता यावा यासाठी संशोधन करून स्मार्ट नाईफची निर्मिती केली आहे. त्याच्या या संशोधनाची दखल केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने घेतली आहे. त्याचे हे संशोधन दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय इन्स्पायर अवाॅर्ड प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहे. ओंकार शिंदेला शाळेचे राज्य पुरस्कार प्राप्त विज्ञान शिक्षक भाऊसाहेब राणे यांचे मार्गदर्शन लाभले.
अशी सुचली कल्पनामाझी आई कांदा कापताना तिच्या डोळ्यात नेहमी पाणी येत असे. तेव्हा मी आईला विचारले की कांदा कापताना तुझ्या डोळ्यात पाणी का येते ? तेव्हा आईने माहीत नाही, असे उत्तर दिले. माझे विज्ञान शिक्षक भाऊसाहेब राणे यांना विचारले तर त्यांनी कांदा कापताना डोळ्यात पाणी येण्याचे शास्त्रीय कारण मला सांगितल्याचे ओंकार म्हणाला.
शास्त्रीय कारण कळलेकांदा कापला जातो तेव्हा त्याच्या पेशी कापल्या जातात, त्यामुळे कांद्यातून गंधकयुक्त ऑक्साईड बाहेर पडते हे ऑक्साईड बाष्पनशील असल्यामुळे त्याचे रुपांतर वायूत होऊन हवेत मिसळून डोळ्यांपर्यंत पोहोचतो. जेव्हा हा वायू आणि डोळ्यातील पाण्याचा संयोग होतो तेव्हा सल्फोनिक ॲसिड तयार होते. यामुळे डोळे चुरचुरतात आणि डोळ्यातून पाणी येते.
असा करतो काम स्मार्ट चाकूत्यामुळे जर कांदा कापताना बाहेर पडणारा गॅस डोळ्यांपर्यंत पोहचलाच नाही तर ? डोळ्यातून पाणी येणार नाही, असे ओंकारला वाटले. नंतर त्याने चाकूच्या मुठीवर ड्रोन मोटर बसवून त्याला छोटा फॅन जोडला आणि बॅटरीच्या साह्याने ऑपरेट करून कांदा कापताना बाहेर पडणारा गॅस विरुद्ध दिशेने ढकलण्याची व्यवस्था केली. परिणामी गॅस आणि डोळ्याचा संपर्क येत नसल्यामुळे डोळ्याला पाणी न येता आता सराईतपणे स्मार्ट नाईफच्या साह्याने कांदा कापता येतो. या प्रयोगासाठी हाय स्पीड ड्रोन मोटर , प्रोपोलर सीएफजी स्वीच ,३.७ व्होल्ट बॅटरी वायर ,लोखंडी चाकू ,चार्जर आदी साहित्याचा त्याने उपयोग केला.
मोबाइल चार्जर, सौर उर्जेवर होतो चार्जचार्जिंग युनिट आणि कांदा कापणारी पाती वेगवेगळी करता येत असल्यामुळे कांदा कापल्यानंतर स्मार्ट नाईफची पाती धुणे सुलभ आहे. मोबाईल चार्जरच्या साह्याने तसेच सौर ऊर्जेवरही स्मार्ट नाईफ चार्ज करता येईल. स्मार्ट नाईफमध्ये छोटी किंवा मोठी अशा वेगळ्या आकाराची पाती वापरता येतात. हाय स्पीड ड्रोन मोटरचा यात वापर केला आहे. गृहिणींसाठी तसेच कांदा पोहे करणारे स्टॉल,भेळ गाडी,मोठे हॉटेल इत्यादी ठिकाणी हा स्मार्ट नाईफ अत्यंत उपयुक्त ठरू शकतो.
ग्रामीण मुलांमध्येही टॅलेन्टआपल्या देशात संशोधकांची संख्या वाढविण्याच्या दृष्टिकोनातून भारत सरकार प्रयत्न करत आहे. इन्स्पायर अवाॅर्ड योजना शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्यरत आहे. ग्रामीण मुलांमध्येही टॅलेन्ट आहे, त्यांना मार्गदर्शन आवश्यक आहे. लवकरच ओंकार शिंदेचा स्मार्ट नाईफ केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनच्या सहकार्याने गृहिणींच्या सेवेत दाखल झाला तर नवल वाटायला नको.
-भाऊसाहेब राणे, राज्य पुरस्कारप्राप्त विज्ञान शिक्षक, जिल्हा परिषद शाळा, कुर्ला, ता. बीड.