बीड - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज बीड जिल्ह्यातील पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात पवारांनी बीडमधील काही उमेदवारांची घोषणा केली. त्यावेळी, उपस्थित कार्यकर्त्यांनीही या नावांची घोषणा होताच जल्लोष केला. शरद पवार यांनी बीड जिल्ह्यातील पाच संभाव्य उमेदवारांची घोषणा केली. आपल्या महाराष्ट्र दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा उमेदवारांची पहिली यादी पवार यांनी जाहीर केली.
बीडमधील कार्यक्रमात बोलताना पवार यांनी मोदी सरकार आणि फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यानंतर, आगामी विधानसभा निवडणुकांसाठी तयार राहण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. तसेच, मी तरुणांच्या जोरावर मी ही निवडणूक लढवत आहे, असे म्हणत पवार यांनी राष्ट्रवादीच्या 5 उमेदवारांची घोषणा केली. विशेष म्हणजे पवार यांनी तरुण उमेदवारांना संधी दिल्याचे दिसून येत आहे. पवार यांनी व्यासपीठावरच उमेदवारांची घोषणा केली, त्यावेळी उमेदवारांनी पवार यांचे आशीर्वाद घेतले.
पवार यांनी, परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांना उमेदवारी दिल्याचे घोषित केले. तर गेवराई मतदारसंघातून विजयसिंह पंडित, केजमधून विमलताई मुंदडा यांच्या कार्याला पुढे नेणारे नेतृत्व म्हणून नमिता मुंदडा यांच्या नावाची घोषणा केली. तसेच, बीडमधून संदीप क्षीरसागर आणि माजलगावमधून प्रकाश सोळंके असे पहिले पाच उमेदवार शरद पवार यांनी जाहीर केले. तर, जिल्ह्यातील एकमेव बाकी राहिलेल्या आष्टी या मतदारसंघातील उमेदवार लवकरच जाहीर करु, असेही पवारांनी सांगितलं.
2014 मध्ये निवडून आलेले या 5 जागांवरील विद्यमान आमदार
गेवराई – लक्ष्मण पवार (भाजप)माजलगाव – आर.टी. देशमुख (भाजप )बीड – जयदत्त क्षीरसागर (राष्ट्रवादी – सध्या शिवसेना)केज – संगिता ठोंबरे (भाजप)परळी – पंकजा मुंडे (भाजप)