परळी : तालुक्यातील बोगस अकृषिक परवानगी आदेश, नकाशे जोडून व तुकडेबंदीचा भंग करुन झालेले खरेदी खताचे फेरफार नामंजूर करण्याचे आदेश तहसीलदार परळी यांनी मंगळवारी दिले आहेत. सामाजिक कार्यकर्ते अॅड. परमेश्वर गित्ते यांनी या प्रकरणी तहसीलदारांकडे तक्रार दाखल केली होती.
परळी येथील दुय्यम निबंधक हे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांचे बोगस व बनावट अकृषिक परवानगी आदेश व नगर रचनाकार यांचे बनावट नकाशे जोडून तुकडेबंदीचा भंग करुन खरेदीखत दस्तांची नोंदणी करत असल्याचे उघडकीस आले होते. सामाजिक कार्यकर्ते अॅड. परमेश्वर गित्ते यांनी तहसीलदार सुरेश शेजुळ यांना पुराव्यानिशी हे निदर्शनास आणून दिले. तसेच दि.१२/१०/२०२१ रोजी त्यांनी तक्रार दाखल केली.
यावरून तहसीलदारांनी तालुक्यातील मंडळ अधिकारी व तलाठी यांना परीपत्रक काढून, तालुक्यातील बनावट अकृषिक आदेश,७/१२, नकाशे व तुकडेबंदीचा भंग करुन खरेदीखताचे फेरफार होत असल्याबाबत या कार्यालयाचे निदर्शनास आले आहे, तरी अकृषिक आदेश, नकाशे,७/१२, तसेच इतर तत्सम पुरावे तपासून व खात्रीकरून फेरफार मंजूरीची कार्यवाही करावी. तसेच बेकायदेशीर अकृषिक आदेश, नकाशे व तुकडेबंदीचा भंग करुन झालेले खरेदी खताचे फेरफार नामंजूर करावेत. बेकायदेशीर अकृषिक आदेश, नकाशे व तुकडेबंदीचा भंग करुन झालेले खरेदी खताचे फेरफार घेतल्याचे वा मंजूर केल्याचे निदर्शनास आल्यास आपल्याविरुद्ध कायदेशीर कार्यवाही अनुसरण्यात येईल, असे आदेश दिले. यापुढे बोगस व बनावट अकृषिक आदेश व नकाशे जोडून तसेच तुकडेबंदीचा भंग करुन खरेदीखत दस्त नोंदणीचे फेरफार तलाठी यांनी घेतल्यास, मंडळ अधिकारी यांनी मंजूर केल्यास त्यांचे विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा अॅड. गित्ते यांनी दिला आहे.