लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मद्यपान करून वाहन चालविल्यामुळे अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे वाहनचालक दारू प्यायला आहे का, याची तपासणी करण्यासाठी ब्रेथ ॲनालायझरचा वापर केला जातो. मात्र, कोरोना संसर्गामुळे ब्रेथ ॲनालायझर धूळखात पडले असून, तळीराम सर्रास वाहन चालवताना सापडतात. त्यांच्यावर पोलिसांची करडी नजर असते.
याअंतर्गत मागील वर्षभरात ३०३ गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आले आहेत. मद्यप्राशन करून वाहन चालविल्यामुळे झालेल्या अपघातांची संख्या धुळे - सोलापूर व विशाखापट्टणम - कल्याण या महामार्गांवर सर्वाधिक आहे. या अपघातात मृत्यू होणाऱ्यांमध्ये दुचाकीस्वारांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळून अपघात टाळावेत, असे आवाहन वाहतूक विभाग व महामार्ग पोलिसांकडून नागरिकांना वेळोवेळी केले जाते. कोरोना संसर्गामुळे वाहनचालक दारू प्यायला आहे का, याची होणारी तपासणी सध्या बंद आहे. मात्र, संशय आल्यानंतर पोलिसांकडून संबंधित चालकांची रुग्णालयात तपासणी करून ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह प्रकरणी गुन्हे दाखल केले जात आहेत.
आश्चर्य ! मेमध्ये कोणीच ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह केले नाही
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चअखेरीस लॉकडाऊन करण्यात आले होते. याकाळात मद्यविक्रीवर निर्बंध होते. लॉकडाऊनमुळे बाहेर फिरणे बंद होते. त्यामुळे मे महिन्यात ड्रंक ॲण्ड ड्राईव्हप्रकरणी एकही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यानंतरही डिसेंबरपर्यंत गतवर्षीच्या तुलनेत कमी कारवाई झाली आहे.
चोरट्या पद्धतीने दारूविक्री
कोरोना काळात दारू विक्रीवर निर्बंध होते. याकाळात चोरट्या पद्धतीने अनेक हॉटेल व वाईन शॉपवरून दारू विक्री चढ्या दराने केली जात होती. याकाळात दारूविक्री करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले होते तर चोरट्या पद्धतीने दारूविक्री करून लॉकडाऊननंतर दारूबंदी विभागाला माहिती द्यावी लागेल, या भीतीने अनेकांनी दारू चोरीला गेल्याची फिर्याद देत गुन्हे दाखल केले होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ब्रेथ ॲनालायझरद्वारे तपासणी बंद आहे. मात्र, संशयित आढळल्यास त्या वाहनचालकाची रुग्णालयात तपासणी करून कारवाई केली जात आहे.
कैलास भारती, वाहतूक शाखाप्रमुख, बीड
ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह कारवाई
सन २०१९-२०२० महिना जानेवारी ५८-८१ फेब्रुवारी १८-३९ मार्च १२०- ९७ एप्रिल ९-१ मे ७-० जून ५४-४
जुलै ६३-१ ऑगस्ट १३-३ सप्टेंबर १५- ३ ऑक्टोबर ६-५ नोव्हेंबर ८३-२९ डिसेंबर ९९-४०