बीड : गेवराई तालुक्यातील खळेगाव सज्जा येथे कार्यरत असलेले तलाठी यांनी ऑनलाइन सातबाऱ्याचे शासकीय शुल्क २४० रुपये स्वीकारले होते. त्याचे रूपांतर खोट्या गुन्ह्यात करून कारवाई करत, बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकारी राजकुमार पाडवी याने एक लाख रुपये मागितल्याची तक्रार तलाठी दादासाहेब आंधळे यांनी थेट पोलीस महासंचालकाकडे केली. या तक्रारीमुळे पाडवी यांची बदली करण्यात आली असून, चौकशी सुरू करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, राजकुमार पाडवी यांनी दुसऱ्या एका प्रकरणात गेवराई जिल्हा परिषद अंतर्गत बांधकाम विभागातील पाणीपुरवठा विभागातील अभियंता शेख समद यांना एक हजाराची लाच घेताना कारवाई केली होती. त्यानंतर त्यांचे भाऊ शेख जमालोद्दीन यांना तुमच्या भावाच्या गुन्ह्यात व दोषारोपत्रात मदत करतो, असे सांगून पोलीस निरीक्षक पाडवी व त्यांच्या सहकाऱ्याने दोन लाख रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ही रक्कम ५० हजार रुपये घेण्याचे ठरले. यासंदर्भातील ‘व्हॉइस रेकॉर्डिंग’ प्रसारितदेखील झाली आहे. त्यानंतर एसीबीचे पोलीस महासंचालक यांच्याकडे शेख जमालोद्दीन व खुद्द तलाठी दादासाहेब आंधळे यांनी पुराव्यानिशी तक्रार सादर करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याप्रकरणानंतर पोलीस निरीक्षक राजकुमार पाडवी यांची बीड येथून औरंगाबाद येथे बदली करण्यात आली असून, चौकशी सुरू करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.
बदनामीच्या भीतीने कारवाई नाही
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राजकुमार पाडवी यांनी लाच मागितल्यासंदर्भात बीड एसीबीकडे तक्रार करून ट्रॅप लावण्याची मागणी केली होती. मात्र, एसीबीचा अधिकारी ट्रॅपमध्ये अडकला तर बदनामी होईल या भीतीने कारवाई करण्यात आली नाही. तसेच पाडवी यांना तक्रारीसंदर्भात माहिती दिल्याचा गंभीर आरोपदेखील तक्रारीत आला आहे. यासंदर्भात बीड एसीबीचे उपाधीक्षक बाळकृष्ण हानपुडे यांच्याशी विचारणा केली असता अशी कुठलीही तक्रार आली नसल्याचे त्यांनी सांगितले.
दबक्या आवाजात चर्चा
प्रशासनाच्या अनेक विभागातील अधिकाऱ्यांकडून विशेष पोलीस ठाण्यांमधून एसीबीला हप्ता दिला जात असल्याची चर्चा दबक्या आवाजात नेहमीच केली जाते. यासंदर्भातदेखील चौकशी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.