बीड : सातव्या वेतन आयोगानुसार वेतन वाढीच्या फाईलवर सही करण्यासाठी १२०० रुपयांची लाच स्वीकारताना पाटोदा तालुक्यातील वाहली येथील शाळेचा प्रभारी मुख्याध्यापक एकनाथ लाड याला एसीबीने सोमवारी रंगेहाथ पकडले.एकनाथ लाड हा सध्या वाहली येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेवर प्रभारी मुख्याध्यापकपदी नियुक्त आहे. शाळेतील एका कर्मचाऱ्याच्या सातव्या वेतन आयोगानुसार वेतन वाढीच्या फाईलवर सही करून ती फाईल बीड येथे लेखा विभागात सादर करण्यासाठी लाडने बाराशे रुपयांची लाच मागितली होती. सदरील कर्मचाऱ्याने शनिवारी याबाबत बीड एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने तक्रारीची खातरजमा करून सोमवारी वाहली येथे सापळा लावला. त्यानंतर मुख्याध्यापक लाड याने स्वत:च्या कक्षात तक्रारदाराकडून बाराशे रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने झडप मारून त्याला पकडले. सध्या त्याच्यावर अंमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बीड एसीबीचे उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील, निरीक्षक गजानन वाघ, पो.हे.कॉ. दादासाहेब केदार, विकास मुंडे, अमोल बागलाने, राकेश ठाकूर, प्रदीप वीर, मनोज गदळे, कल्याण राठोड, सखाराम घोलप आणि भारत गारदे यांनी पार पाडली.
१२०० रुपयांची लाच; मुख्याध्यापक चतुर्भुज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2019 12:03 AM