बीड : देशी दारूच्या बॉक्सची वाहतूक करू देण्यासाठी व कारवाई न करण्यासाठी मासिक हप्ता म्हणून पाच हजार रूपयांची लाच घेताना पोलिस हवालदारास रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई केज तालुक्यातील युसूफवडगाव पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच शनिवारी दुपारी छत्रपती संभाजीनगरच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने केली. या कारवाईवरून दारू विक्रेते आणि पोलिसांचे लागेबांधे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रावसाहेब गणपत मुंडे (वय ५१) असे पकडलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. या प्रकरणातील तक्रारदार हा देशी दारू बॉक्सची वाहतूक युसुफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका खेडेगावात करत असतो. हीच वाहतूक करू देण्यासाठी आणि कारवाई न करण्यासाठी रावसाहेब मुंडे हे प्रत्येक महिन्याला तक्रारदाराकडून पाच हजार रूपयांची मागणी करत असत. अशीच मागणी शनिवारी केल्यानंतर तक्रारदाराने छत्रपती संभाजीनगरच्या एसीबीकडे तक्रार केली. त्याप्रमाणे पथकाने खात्री केली. त्यावरून दुपारच्या सुमारास पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच मुंडे यांनी लाच स्विकारली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. ज्या पोलिस ठाण्यात नौकरी केली, त्याच ठाण्यात रावसाहेब मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर, सहायक फौजदार विठ्ठल राख, हवालदार नागरगोजे, सुनील पाटील, चंद्रकांत शिंदे आदींनी केली.