बीड : गेल्या दीड वर्षापासून जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाकाळात सर्व व्यवहार ठप्प झाले असताना दुसरीकडे लाचखोरी जोरात सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या दीड वर्षात ३० कारवाया केल्या आहेत. यामध्ये महसूल विभाग सर्वांत पुढे असल्याचे पाहायला मिळत आहे, तर २०२१ या वर्षात पोलीस प्रशासनात एकही कारवाई झालेली नाही.
कोरोनाला रोखण्यासाठी शासनाने कधी लॉकडाऊन, तर कधी संचारबंदी जाहीर केली आहे. यामुळे उद्योग व्यवहारासह इतर सर्वत्र व्यवहार ठप्प झाले आहेत. परिणामी, अनेक जण आर्थिक संकटात सापडलेले आहेत. असे असतानाही लाचखोरी मात्र जोरात सुरू असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.
एसीबीने दीड वर्षात तब्बल ४६ कारवाया केल्या आहेत. यात २०२० व २०२१ या वर्षात महसूल विभागातील १० कारवाया केल्या आहेत. इतर विभागापेक्षा महसूल विभाग लाचखोरीत सर्वांत पुढे असल्याचे दिसून येत आहे. त्याखालोखाल जिल्हा परिषद विभागाचा क्रमांक असून, नागरिकांनी त्यांच्या कामासाठी प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधींनी लाच मागितल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे कारवाई करावी, असे आवाहन एसीबीकडून करण्यात येत आहे.
....
एसीबीच्या सापळ्यात अडकले ४६ जण
एसीबीकडे तक्रार आल्यानंतर २०२० व २०२१ या वर्षात आतापर्यंत ३० वेळा कारवाई करण्यात आली असून, यामध्ये जवळपास ४६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर यात काही वर्ग एकच्या अधिकाऱ्यांचादेखील समावेश आहे. २०२१ या वर्षात कोरोना काळात लॉकडाऊन असतानादेखील ९ वेळा कारवाई करण्यात आली असून, यात ११ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर काही वेळा कारवाई करण्यासाठी परजिल्ह्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथकदेखील आले होते.
कोरोनाकाळात ‘महसूल’वर
कमाई जोरात
महसूल ४, जिल्हा परिषद पंचायत व शिक्षण ३, ग्रामविकास खाते १, वित्त विभाग १.
कोणत्या वर्षात किती कारवाया
२०१८ - २३
२०१९ - २३
२०२० - २१
....
शासकीय कामासाठी एखादा अधिकारी व कर्मचारी लाच मागत असेल, तर त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करावी, या तक्रारीची दखल घेऊन कारवाई केली जाईल, तसेच तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवत त्यांचे काम करून देण्याची जबाबदारी घेतली जाईल.
-बाळकृष्ण हानपुडे, उपाधीक्षक, एसीबी, बीड