बीड : १ कोटी रूपयांची लाच मागणाऱ्या हरिभाऊ खाडेविरोधात जिजाऊ मल्टीस्टेटचे ठेविदार शुक्रवारी आक्रमक झाले होते. त्यांनी खाडेला कोर्टातून बाहेर काढताना मुख्य प्रवेशद्वारावर शिवीगाळ करत जोरदार घोषणाबाजी केली. लाचखोर हरिभाऊ खाडे, मुर्दाबाद... मुर्दाबाद..., पैसे घेणाऱ्या खाडेचा धिक्कार असो.. असे म्हणत ठेविदारांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, खाडेला न्यायालयाने २९ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
जिजाऊ मल्टिस्टेटच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एका बिल्डरकडून १ कोटी रुपयांची लाच हरिभाऊ खाडे याने मागितली होती. याप्रकरणी सहायक फौजदार आर.बी. जाधवरसह खासगी इसम कुशल जैन याच्याविरोधात १५ मे रोजी गुन्हा दाखल झाला होता. १ कोटीपैकी पाच लाख रुपये घेताना जैनला ताब्यातही घेतले होते. तर, खाडे आणि जाधवर हे दोघेही फरार होते. खाडेच्या घरात १ कोटी ८ लाखांची रोकड, किलोभर सोने आणि साडे पाच किलो चांदी सापडली होती. तर, जाधवरच्या घरातही पाव किलो साेने सापडले होते. त्यांच्या तपासासाठी एसीबीने पथकेही नियुक्त केली होती. परंतु, त्यांना पकडण्यात यश आले नाही. आठवडाभर धावपळ करून खाडे हा गुरुवारी एसीबीसमाेर शरण आला होता. तर जाधवर हा अजूनही फरार आहे.
दरम्यान, खाडेला शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला २९ मे पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. न्यायालयातून बाहेर काढून एसीबी कार्यालयात वाहनातून नेत असताना कोर्टाच्या गेटवर जिजाऊच्या ठेविदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. लाचखोर खाडे मुर्दाबाद, खाडे करायचे काय, खाली मुंडके वर पाय.. अशा घोषणा देत संताप व्यक्त केला. यातील काही लोकांनी त्याला पोलिसांसमाेर शिवीगाळही केला. खाडे मात्र, गाडीचे काच बंद करून ठेविदारांचा हा संताप पहात होता. खाडेला कोर्टातून बाहेर काढताना पोलिसांचा माेठा बंदोबस्त तैनात केला होता.