बीड : राज्यात रविवारी झालेल्या राजकीय भूकंपाने बीडच्या राजकारणातही नवा ट्विस्ट आला आहे. दोन दिवसांपूर्वीच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी २०२४ साठी स्वत:ची उमेदवारी जाहीर केली असतानाच त्यांचेच बंधू राष्ट्रवादीचे आ. धनंजय मुंडे यांना भाजप-शिवसेना सरकारने मंत्रीपद दिले आहे. त्यामुळे भविष्यात विद्यमान मंत्री म्हणून धनंजय मुंडे यांनाच परळीतून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. असे असले तरी या सर्व घडामोडींवर पंकजा मुंडे यांनी मौन बाळगले आहे. त्यांच्या भूमिकेकडे आता बीडच नव्हे तर राज्याचे लक्ष लागले आहे.
राज्याच्या राजकारणात बीडमधील बहीण-भावाच्या लढतीकडे जास्त लक्ष असते. २०१४ साली विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंंडे यांचा पराभव करत मंत्रीपद मिळविले होते. त्याकाळात भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते पंकजा मुंडे यांच्यावर नाराज होते. त्या ठराविक नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनाच भेटतात, काही लोक त्यांची भेट होऊ देत नाहीत, असे आरोप त्यांच्यावर झाले होते तर दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे यांनी पराभवानंतरही मतदारसंघात संपर्क कायम ठेवला. त्यामुळेच २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी वचपा काढत बहीण पंकजा यांचा पराभव केला. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपदही मिळविले होते. मध्यंतरी वर्षभरापूर्वी सरकार बदलल्याने ते विरोधी पक्षात राहिले. परंतु आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत जाऊन त्यांनी भाजप-शिवसेना सरकारमध्ये रविवारी मंत्रीपद मिळविले आहे.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभा निवडणुकीत नेमके कोणाला उमेदवारी मिळणार ? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. धनंजय मुंडे हे विद्यमान आमदार आणि त्यातही मंत्री असल्याने त्यांचे पारडे जड आहे. तर भाजप नेत्या पंकजा मुंडे या पराभूत उमेदवार आहेत. त्यामुळे आगामी काळात युती राहिली तर कोण उमेदवार असणार ? याकडे लक्ष लागले आहे.
अस्वस्थ पंकजा मुंडेंकडून उमेदवारी जाहीरपंकजा मुंडे या पक्षात अस्वस्थ असल्याच्या चर्चा आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बीडमध्ये कार्यक्रम असतानाही त्यांची कार्यक्रमास अनुपस्थिती असायची. तसेच आपण अमित शाह यांनाही भेटणार असल्याचे त्यांनी ३ जून रोजी परळीत सांगितले होते. तसेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, तुमची लेकही पंतप्रधान होऊ शकते, दिल्लीमध्येही त्यांनी मी भाजपची आहे, पण भाजप माझा नाही, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांनी २०२४ च्या निवडणुकीसाठी स्वत:सह भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांची उमेदवारीच जाहीर केली होती. त्यातच रविवारी राजकीय घडामोडी घडल्या आहेत.
पंकजा-धनंजय यांच्यातील दुरावा कमीमागील काही महिन्यांत पंकजा व धनंजय मुंडे या बहीण-भावातील दुरावा कमी होताना दिसत आहे. परळीत जवाहर शिक्षण संस्था, वैद्यनाथ कारखाना निवडणुकीत ते एकत्र आले होते. त्यामुळे कार्यकर्तेही संभ्रमात होते. आता पुन्हा एकदा बहीण-भाऊ एकाच युतीच्या सरकारमध्ये आल्याने बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. याबाबत पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांच्या स्वीय सहायकांनी त्यांनी अद्याप काहीही प्रतिक्रिया दिली नसल्याचे सांगितले.