आष्टी : तालुक्यातील धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत कालबाह्य झाली असून कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील खोल्यांची पडझड झाली आहे. परिसरातील गावांतील ५० हजार लोकसंख्येसाठी नियमित कार्यरत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रश्नाकडे संबंधित विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यात धामणगाव, खिळद, सांगवी, बीडसांगवी, किन्ही डोईठाण, पाटसारा, कारखेल,नागतळा,पांगरा हे दहा उपकेंद्र आहेत या अंतर्गत जवळपास ४७ गावे आहेत. तालुक्यातील धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत लहान मुलांचे लसीकरण सत्र, कुटुंब नियोजनाचे शस्त्रक्रिया शिबिर, साथरोग नियंत्रण कार्यक्रम, माता-बाल आरोग्य कार्यक्रम, नियमित रुग्णांना रुग्णसेवा देणे यासारखे इतर स्वास्थ्य विषयक अनेक कार्यक्रम आरोग्य केंद्रामार्फत नियमितपणे चालू असतात. रुग्ण सेवा पूर्ण क्षमतेने देण्यासाठी आरोग्य अधिकारी व इतर कर्मचारी असे मिळून जवळपास ३६ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी काही पदे रिक्त आहेत. येथील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून जनतेला चांगली आरोग्य सेवा देता यावी म्हणून त्यांच्या निवासाची सोय आरोग्य केंद्र परिसरामध्ये करण्यात आली आहे. परंतु सद्य:स्थितीत तीन निवासस्थाने नवीन आहेत. इतर निवासस्थाने व लसीकरण खोल्यांची मात्र पडझड झाली आहे. या खोल्या राहण्यायोग्य नसल्या तरीही काही आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून तेथे राहत आहेत व रुग्णसेवा देत आहेत. आमदार, खासदार आदी लोकप्रतिनिधींच्या शासकीय निधीतून लाखो रुपये नवीन इमारती,मंदिरासमोर सभामंडप, सिमेंट ब्लॉक, सभागृह, तीर्थक्षेत्र विकासाच्या कामावर खर्च केला जातो. मात्र जनतेला रुग्णसेवा देणाऱ्या धामणगाव आरोग्य केंद्र इमारती व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाला निधी मिळत नाही, असा खेद आरोग्यप्रेमी नागरिकांनी व्यक्त केला. या पडझड झालेल्या इमारतीच्या नवनिर्माणासाठी तत्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी धामणगाव परिसरातील सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे.
===Photopath===
150321\15bed_2_15032021_14.jpg~150321\15bed_1_15032021_14.jpg
===Caption===
धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसह कर्मचारी निवासस्थानाची दुरवस्था झाली आहे.