इमारतीची पडझड, भोवती घाणीचा विळखा, पाच वर्षांपासून कुलूप उघडले नाही
नितीन कांबळे
कडा : आष्टी तालुक्यातील धामणगांव आणि परिसरातील अनेक गावाच्या जनतेसाठी शासनाच्या विविध महसूल सेवा स्थानिक पातळीवरच मिळाव्यात, यासाठी मंडळ अधिकारी यांचे कायमस्वरुपी कार्यालय लाखो रूपये खर्च करुन थाटले आहे. पण, येथील कार्यालय इमारत पूर्ण होऊन तेथे कार्यालय सुरु न होता तिच्या अवतीभोवती कचरा आणि घाण साचली आहे. इमारतीची आता पडझड सुरु होऊन इमारतीला उतरती कळा आली. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
अद्यापपर्यंत या इमारतीचे कुलूपच उघडले नसल्याने मंडळाधिकारी हे अद्याप एकदाही या खुर्चीवर बसले नसल्याने हे कार्यालय बकाल झाले.
मंडळाधिकारी कार्यालयातून मिळणाऱ्या प्रशासकीय सेवा स्थानिक पातळीवरच मिळाव्यात, जनतेची गैरसोय होऊ नये, त्यांना तातडीने सेवा मिळतील, त्यांना तालुक्याला येण्याचा आर्थिक भुर्दंड बसणार नाही, यासाठी शासनाने मोठा निधी खर्च करून अद्ययावत अशी मंडळ अधिकारी कार्यालयाची इमारत बांधली आहे. इमारतीचे काम पूर्ण होऊन जवळपास पाच वर्ष होऊन देखील या इमारतीत कार्यालय सुरु झाले नाही.
सर्वसामान्य जनतेचा थेट संबंध येणारे शासकीय कार्यालय म्हणून मंडळाधिकारी कार्यालयाकडे पाहिले जाते. शेती संबंधी महत्त्वाची कामे,आपत्कालीन परिस्थितीत पंचनामे, विधवा, परितक्त्या, निराधार, अपंग, ज्येष्ठ नागरिक यांना अनेक कामांसाठी मंडळ कार्यालयात हेलपाटे घालावे लागतात. धामणगांव येथील कार्यालयात कामकाज सुरू न केल्याने जनतेला आपली कामे करता- करता मोठा त्रास होतो. त्याचबरोबर बांधून पूर्ण असलेली इमारत घाणीच्या विळख्यात पडली आहे. तिची पडझड होऊ लागली आहे. येथे शासकीय कार्यालय थाटायचे नव्हते तर, शासनाने लाखो रुपये खर्च करून इमारत बांधली का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ह्या मंडळ कार्यालयात कामकाजास सुरूवात झाल्यास धामणगाव आणि परिसरातील अनेक गावांच्या जनतेची मोठी गैरसोय थांबेल. मंडळाधिकारी देखील फिरकत नाहीत, याकडे तहसीलदार यांनी लक्ष देऊन लवकरात लवकर कार्यालय सुरु करावे व कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष ससाणे यांनी केली आहे.
याबाबत आष्टी येथील तहसीलदार शारदा दळवी यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, येथील मंडळाधिकारी कार्यालय अद्ययावत महसूल विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले नसून लागूनच घाणीचा विळखा असल्याने मंडळाधिकारी बसत नसल्याचे त्यांंनी सांगितले.
230821\5013img-20210820-wa0134_14.jpg