......
रिडिंग घेऊनच वीजबिल द्यावे
अंबाजोगाई : तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून जे वीजबिल दिले जात आहे ते अनेकदा रिडिंग न घेताच दिले जाते. ग्रामीण भागात तर हा प्रकार सर्रास सुरू आहे. परिणामी वीजबिल मोठ्या प्रमाणात येत आहे. याबाबत विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विलास कानसुरकर यांनी केली आहे.
...
बेरोजगारीमुळे युवा पिढीत नैराश्य
अंबाजोगाई : महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेले हजारो तरुण, तरुणी नोकरीच्या शोधात आहेत. कोरोनामुळे अनेक उद्योग, व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे जे कामावर होते, तेही बेरोजगार झाले आहेत. अनेक जण नवीन कामाच्या शोधात आहेत. मात्र, बाजारपेठेत असणारी आर्थिक मंदी व लॉकडाऊन यामुळे अनेकांना अपयश येत असल्याने तरुणांमध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली आहे.
.....
पुन्हा वाढला प्लास्टिक पिशव्यांचा वापर
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरासह तालुक्यात प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सगळीकडे कचरा दिसून येत आहे. फळविक्रेते, भाजीविक्रेते, किराणा दुकानदार पुन्हा मोठ्या प्रमाणात कॅरीबॅग्जचा वापर करू लागले आहेत. यामुळे शासनाच्या आदेशाला तिलांजली मिळत आहे. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी प्लास्टिकचा वापर बंद करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने ठोस उपाययोजना आखाव्यात, अशी मागणी निसर्गप्रेमींमधून होत आहे.
....
पोलीस शिपाई भरतीची वयोमर्यादा वाढवा
अंबाजोगाई : शासनाच्या वतीने मागील २-३ वर्षापासून पोलीस शिपाई भरती प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो तरुण बेरोजगार झाले आहेत. ते अजूनही पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्राच्या बेरोजगार युवकांच्या दृष्टीकोनातून पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा ३३ वरून ३५ करण्यात यावी. त्यामुळे बेरोजगारांना संधी उपलब्ध होईल, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते कल्याण नेहरकर यांनी केली आहे.