बीड : दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने सराफा दुकानात जाऊन गंडा घालणारी टोळी सक्रिय झाल्याची भीती आहे. २४ तासांत गेवराई व परळी येथे या घटना घडल्याने व्यापाऱ्यांत दहशत निर्माण झाली आहे.
गेवराईतील सराफा लाइनमध्ये रवींद्र अंबादास दहिवाळ यांचे दुकान आहे. १० रोजी दुपारी अडीच वाजता दुकानात चार महिला साखळी खरेदीच्या बहाण्याने आल्या. साखळी पाहण्याचे नाटक करून व्यापाऱ्याची नजर चुकवून त्यांनी चांदीचे ३७ हजार २०० रुपये किमतीचे ६०० ग्रॅमचे दागिने लंपास केले. सायंकाळी दागिन्यांची मोजदाद करताना हा प्रकार लक्षात आल्यावर दहिवाळ यांनी गेवराई ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून गुन्हा नोंद झाला. दुसरी घटना परळीतील संभाजीनगर ठाणे हद्दीतील सराफा व्यापारपेठेत घडली. ९ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता अनोळखी दोन महिला व पुरुष असे तिघे आले. त्यांनी दागिने खरेदीचे नाटक करून दुकानदार कामात व्यस्त असल्याची संधी साधून १५ ग्रॅमची ७२ हजार ७५० रुपयांची सोनसाखळी लंपास केली. सुदीप सुभाष टाक यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला.