बीड : केंद्र शासनाने लागू केलेल्या एचयुआयडी या किचकट कायद्याला विरोध करण्यासाठी जिल्ह्यातील सराफ व सुवर्णकारांनी २३ ऑगस्ट रोजी सर्व दुकाने बंद ठेवली. सोमवारी सुटीमुळे मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. सोमवारी जिल्ह्यातील सराफा, सुवर्णकार आणि कारागीरांची लहान-मोठी जवळपास १८०० दुकाने बंद होती.
केंद्र शासनाने १ जुलै २०२२ पासून सराफ व सुवर्णकार यांच्यासाठी एचयुआयडी हा कायदा लागू केला आहे. त्यामुळे सराफ व सुवर्णकारांना दिवसभर दुकानातील कामाव्यतिरिक्त कारकुनी कामाचाच ताण वाढणार आहे. याशिवाय याअंतर्गत सोने मिळण्यासाठी उशीर लागणार आहे. त्याचा फटका ग्रामीण भागातील छोट्या व्यावसायिकांना बसणार आहे. अगोदरच दिवसभर मालाचे संरक्षण करणे अत्यंत जोखमीचे बनलेले असताना व कोरोनामुळे व्यवसाय अडचणीत आलेला असताना, या नव्या कायद्याने सर्व व्यावसायिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे सहसचिव तथा बीड सराफ सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश लोळगे, सराफ सुवर्णकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश बेदरे, विजय कुलथे, सुरेश मेखे, भास्कर बागडे, देवा मानूरकर, महेंद्र मरलेचा, जनार्धन दहिवाळ, ॲड. संदीप बेदरे, रावसाहेब टाक, गणेश बागडे, अनिल चिद्रवार, मराठवाडा उपाध्यक्ष सुधाकरराव दहिवाळ, कैलास मैड आदी सराफा, सुवर्णकार बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
रावसाहेब दानवे यांना निवेदन
दरम्यान, केंद्रीय रेल्वे व खनिज कोळसामंत्री रावसाहेब दानवे यांना एचयुआयडी कायद्याच्या विरोधात मराठवाडा अध्यक्ष गणेश बेदरे व मंगेश लोळगे यांच्या नेतृत्वाखाली अंबड येथे निवेदन दिले. सराफा, सुवर्णकारांच्या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन रावसाहेब दानवे यांनी दिले.