माजलगाव : लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांची सवलतीची वेळ संपल्यानंतरही ती सुरू ठेवण्यात आल्याने दहा दुकानदारांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माजलगाव शहरात लॉकडाऊन सुरू असून सोमवारपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये जीवनावश्यक वस्तू दुकानांसाठी सकाळी सात ते अकरा या वेळेतच उघडी ठेवण्यास मुभा दिली होती. असे असतानाही सोमवारी माजलगाव शहरातील मोंढा भागातील अनेक दुकाने अकरा वाजेनंतरही सुरू असल्याचे तहसीलदार वैशाली पाटील यांना निदर्शनास आल्यानंतर कारवाई करण्यात आली.
दंड भरल्यानंतरच दिल्या चाव्या
तहसीलदारांनी जुना मोंढा भागात थोरात एजन्सी, सुमित ॲग्रो एजन्सी, आनु मिल्क एजन्सी, महाराष्ट्र कृषी सेवा केंद्र, गणेश किराणा आदींसह दहा दुकान मालकांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला. प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड भरल्यानंतरच या दुकान मालकांना चाव्या परत देण्यात आल्या. तहसीलदार पाटील यांनी केलेल्या या कारवाईचे स्वागत होत असून अशा कारवाईमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांना चाप बसणार आहे.