लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : तालुक्यातील ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या येथील परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात मनुष्यबळ कमी आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ८२ गावांचा २२ पोलिसांवर भार आहे. यामुळे ग्रामीण भागात अवैध धंद्यांना पेव फुटले आहे.
राजकीय व सामाजिक दृष्टीने अतिशय संवेदनशील असलेल्या परळीच्या ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी ग्रामीण पोलीस ठाणे कार्यरत आहे. शहरातील मेरूगिरी पर्वतावरील ठिकाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रशस्त असे कार्यालय आहे. ग्रामीण भागातील ८२ गावांमध्ये लक्ष देण्यासाठी या पोलीस ठाण्यात ६५ कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. मात्र, येथे ३९ कर्मचारी असून, यातील अनेक कर्मचारी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालयात व अन्य ठिकाणी नियुक्तीस आहेत. यामुळे येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात सध्या स्थिती २० ते २२ कर्मचारी उपलब्ध असतात.
८२ गावांचा कारभार पाहण्यासाठी ग्रामीण पोलीस ठाण्यात एकच शासकीय वाहन उपलब्ध असून, हे वाहनही कालबाह्य झाल्याने, अनेक वेळा नादुरुस्त अवस्थेत असते. ग्रामीण भागात कोठेही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, उपलब्ध कर्मचाऱ्यांची घटनास्थळी पोहोचण्यासाठी तारांबळ उडत आहे. उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांवर मनुष्यबळ कमतरतेमुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे.
....
कारवाईत होतेय हयगय
पोलीस कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने, परळी तालुक्यातील ग्रामीण भागातील राखेची अवैध वाहतूक, हातभट्टी दारू, मटका, जुगार यांसह अनेक अवैध धंद्यांनी डोके वर काढले आहे. यावर कारवाई करण्यात हयगय होत आहे.