लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात हम दो हमारे दो, छोटे कुटूंब सुखी कुटूंब, ही संकल्पना मागील काही दिवसांपासून यशस्वी पणे राबविली जात आहे. कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्यांची संख्या २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये घटली असली तरी या शस्त्रक्रिया करण्यात महिला खुप पुढे असल्याचे समाेर आले आहे. अनेक गैरसमज मनात असल्याने पुरूष नसबंदी करण्यासाठी धजावत नाहीत. त्यामुळे शस्त्रक्रियेचा सर्व भार महिलांच्या खांद्यावर टाकला जात असल्याचे समोर आले आहे. हे गैरसमज दूर करण्यासाठी आता आरोग्य विभागाला विशेष मोहीम घेऊन जनजागृती करण्याची गरज आहे.
काय आहेत गैरसमज?
n नसबंदी केल्यानंतर नंपुसकता येते, काम करण्यासाठी शक्ती राहत नाही. थकवा जाणवतो, माणूस हडकुळा होतो, असे अनेक गैरसमज पुरूषांमध्ये आहेत. त्यामुळे पुरूष महिलांना पुढे करून कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करतात. काही ठिकाणी तर महिला देखील गैरसमजापोटी पुरूषांना नसबंदी करू देत नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
n आरोग्य विभागाला आता यावर जनजागृतीसाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे. यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा आणि जिल्हा रुग्णालयातही जनजागृती करणारे फलक लावण्यासह तपासणीला आलेल्यांना मार्गदर्शन करावे.
जनजागृती करूनही उपयोग होत नाही
महिलांच्या तुलनेत पुरूषांची शस्त्रक्रिया करण्याची संख्या खूपच नगण्य आहे. याबाबत गैरसमज दूर करून जनजागृतीही केली. परंतु जास्त काही उपयोग झाला नाही. पुरूष पुढे येतच नाहीत. आता यावर ग्रामीण व शहरी भागात जनजागृती करण्यासाठी आणखी उपाययोजना केल्या जातील.
- डॉ.आर.बी.पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड