माजलगाव : उसाच्या ट्रॅक्टरला जोडलेली ट्रॉली रस्त्यावर हेलकावे खात अचानक समोर आल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या बसची धडक लागून अपघात झाला. तालुक्यातील गंगामसल्याजवळ राष्ट्रीय महामार्ग ६१ वर गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नसून, बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. रस्त्यावर ट्रॅक्टरला जोडलेल्या दोन- दोन, तीन- तीन ट्रॉल्यांमधून क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहतूक केली जात असल्याने अपघात होत असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी माजलगावकडून परभणीकडे एसटी बस (क्र. एमएच-१४,
बीटी-२१५८) जात हाेती. या मार्गावर गंगामसल्याजवळ पाथरी तालुक्यात ऊस गाळपासाठी घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला जोडलेली ट्रॉली हेलकावे खात अचानक रस्त्यावर समोर आल्याने एसटीची ट्रॉलीला धडक बसली. बसमधील प्रवाशांना किरकोळ मार लागला, तर बसचे नुकसान झाले. ओव्हरलोड ऊस भरून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.