लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आर्थिक देवाण-घेवाणीच्या कारणावरून बाळासाहेब मारोती चव्हाण (४५, रा. पिंपरखेड, ता.आष्टी) या व्यापा-यास सोबत नेवून चौघांनी दगडाने मारहाण करत अंगावर गाडी घालून निर्घृणपणे खून केला व मृतदेह आष्टी तालुक्यातील वाकी शिवारात आणून टाकला होता. या प्रकरणी चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. येथील जिल्हा सत्र न्या.बी.व्ही.वाघ यांच्या न्यायालयात हे प्रकरण चालले. यातील चौघांपैकी तीन आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली तर एकाची निर्दोष मुक्तता केली.
बाळासाहेब चव्हाण हे भुश्याचा व्यापार करत होते. त्यांनी अजित इथापे आणि अमिर सय्यद या दोघांना पैसे दिले होते. याच पैशावरून त्यांचा वाद झाला होता. १० जानेवारी २०१६ रोजी हनुमंत हौसराव कवचाळे याने बाळासाहेब चव्हाण यास आपल्या सोबत दुचाकीवर नेले. पुढे कवचाळेसोबत सोबत अजित इथापे, अमिर सय्यद, गजानन चव्हाण आले.
या चौघांनी मिळून बाळासाहेब चव्हाण यास एका धाब्यावर नेऊन भरपूर दारू पाजली. डोंबळवाडी (ता.कर्जत) शिवारात नेवून बाळासाहेब चव्हाण यास दगडाने गंभीर मारहाण केली. चव्हाण हे मयत झाले असल्याचा समज आरोपींना झाल्यानंतर त्यांचा मृतदेह इतर ठिकाणी टाकून देण्यासाठी चारचाकी गाडी आणली होती. मात्र जखमी अवस्थेत असलेले बाळासाहेब चव्हाण कसेबसे उठून रस्त्याच्या कडेला थांबले होते व ये-जा करणा-यांकडे मदत मागत होते. याचवेळी आरोपींना बाळासाहेब चव्हाण हे जागेवर नसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी शोधाशोध केली असता ते रस्त्यावर जखमी अवस्थेत उभा असल्याचे दिसले.
याचवेळी आरोपींनी त्यांच्या अंगावर गाडी घातली व गाडीच्या बेल्टने गळा आवळून त्यांचा निर्घृण खून केला. त्यानंतर मृतदेह आष्टी तालुक्यातील वाकी शिवारात आणून टाकला. या प्रकरणी मयताचा भाऊ सतिष मारोती चव्हाण यांच्या फिर्यादीवरून आरोपी हनुमंत कवचाळे (रा.शिरापूर), अजित महादेव इथापे (रा.चिंचोली), अमिर भैय्या सय्यद (रा. शिरापूर) आणि गजानन बलभीम चव्हाण (रा.पिंपरखेड) या चौघांविरोधात आष्टी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.
आष्टी ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी तपास करून दोषारोपपत्र बीड येथील प्रथम जिल्हा व सत्र न्या.बी.व्ही.वाघ यांच्या न्यायालयात दाखल केले. साक्षी, पुरावे तपासून न्या.बी.व्ही.वाघ यांनी आरोपी हनुमंत कवचाळे, अजित इथापे आणि अमिर सय्यद या तिघांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा तसेच हनुमंत व अजित यास प्रत्येकी दहा हजार रूपये दंड तर अमिर सय्यद यास एक हजार रूपयांचा दंडा सुनावला. गजानन चव्हाण याची निर्दोष मुक्तता केली.
सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील अजय राख यांनी बाजू मांडली. त्यांना सहायक सरकारी वकील एम.के.वाघीरकर यांनी सहकार्य केले. तर तपास अधिकारी म्हणून पोनि दिनेश आहेर यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून जमादार बिनवडे यांनी सहकार्य केले.सीसीटीव्ही फुटेज, रक्ताचे डाग ठरले पुरावेसरकार पक्षाच्यावतीने २२ साक्षीदार तपासण्यात आले. दारूच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज आणि गाडीतील रक्ताचे डाग हे दोन पुरावे महत्त्वाचे ठरले. त्याचबरोबर काही साक्षी ही महत्त्वाच्या ठरल्या.