परळी : येथील उद्योजक रत्नाकर गुट्टे यांना दारु पिणे, तमाशा पाहणे व बाहेरख्याली पणाचा नाद आहे. विरोध केला तर मारहाण करतात. तू पसंत नाहीस म्हणून शारीरिक व मानसिक छळ करुन जिवे मारण्याच्या धमक्या देतात, अशी फिर्याद रत्नाकर गुट्टे यांची पत्नी सुदामती गुट्टे यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी रत्नाकर यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
रत्नाकर माणिकराव गुट्टे, अंकुश माणिकराव गुट्टे, सुंदराबाई अशोक गुट्टे, कल्पना भागवत गुट्टे, सीताबाई विष्णू मुंडे, विष्णू आबाजी मुंडे, संजय विष्णू मुंडे अशी आरोपींची नावे आहेत. सुदामती गुट्टे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे रत्नाकर गुट्टे यांच्यासमवेत १९८१ साली लग्न झाले. २०१२ पर्यंत त्यांचा संसार सुखाने चालला. मात्र, त्यानंतर पती रत्नाकर यांच्यासह सासरच्यांनी त्यांचा छळ सुरु केला.
पती रत्नाकर यांना बाहेरख्याली तमाशा पाहणे, बाहेरच्यां मुलीसमवेत फिरणे, बाहेरच्या मुलींना घरी आणणे असे प्रकार वाढले होते. २०१२ नंतर तीन वर्षे समजावयाचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी मला तू पसंत नाहीस. तुझी मला गरज नाही. फारकत दे असे म्हणून पती रत्नाकरसह दीर अंकुश हे चिथावणी देत होते. तसेच अनाधिकृतपणे जवळ बाळगल्या जाणाऱ्या पिस्तूलाचा धाक दाखवत जिवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात होत्या. गुट्टे हे एवढ्याच थांबले नाही, तर पत्नी सुदामतीसह त्यांच्या माहेरील लोकांना त्रास देणे सुरु केले. या सर्व प्रकाराला सुदामती गुट्टे वैतागल्या. अखेर त्यांनी परळी शहर पोलीस ठाणे गाठत पती रत्नाकर यांच्यासह सात जणाविरोधात गुन्हा दाखल केला.