अविनाश मुडेगावकर/
अंबाजोगाई तालुक्याला सिंचन व पाणी पुरवठ्यासाठी बुट्टेनाथ साठवण तलाव व्हावा, यासाठीचा प्रस्ताव बारा वर्षांपूर्वी जलसंपदा विभागाकडे सादर झाला आहे. सात वर्षांपूर्वी शासनाने २५ लाखांचा निधी मंजूर करून सर्वेक्षण करण्याचा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता. मात्र, बारा वर्षांचा कालावधी लोटला तरी शासनाच्या दफ्तर दिरंगाईच्या कारभारात या तलावाचे काम रखडले आहे.
दरवर्षी वाणा नदीच्या खोऱ्यातील लाखो लीटर पाणी वाहून जाते. पाण्याचा हा अपव्यय टाळण्यासाठी बुट्टेनाथ साठवण तलाव होणे गरजेचे आहे. या तलावाच्या माध्यमातून अंबाजोगाईचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार आहे. अंबाजोगाई शहरातील १.५ लक्ष लोकांची तहान भागवण्यासाठी राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाकडे अनेक वर्षांपासून गोदावरी खोऱ्यातील वाण उपखोऱ्यातील वाण नदीवर साठवण तलाव बांधण्याची मागणी करण्यात येत आहे. या संदर्भातील पहिला प्रस्ताव २०१० साली सादर केला होता. अंबाजोगाईच्या उत्तरेला अंदाजे दोन किलोमीटर अंतरावरील नागनाथ मंदिराच्या वरील बाजूस वाण नदीवर हा साठवण तलाव निर्माण करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. या नियोजित साठवण तलावस्थळी ५० टक्के विश्वासार्हतेने प्रकल्पस्थळी एकूण उपलब्ध पाणी ५१.०४६ दशलक्ष घनमीटर दाखविण्यात आले असून, साठवण तलावासाठी फक्त १४.५० दशलक्ष घनमीटर जलसंपत्तीचा वापर प्रस्तावित करण्यात आला आहे.
...
मजुरीसाठी पुढाकार कोण घेणार?
बुट्टेनाथ साठवण तलावाच्या मंजुरीसाठी आवश्यक असलेल्या पाणी उपलब्धतेच्या प्रमाणपत्रासाठी हा संपूर्ण प्रस्ताव राज्य शासनाच्या एकमेव नाशिक येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयात या साठवण तलावाच्या बृहत आराखड्यासह अंबाजोगाई येथील कार्यकारी अभियंता कार्यालयाने औरंगाबाद येथील गोदावरी मंडळ पाटबंधारे कार्यालयाकडे सादर केला होता. हा प्रस्ताव या कार्यालयाने पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी पाठवला आहे, तो आजपर्यंत प्रलंबित आहे. किंबहुना वाण उपखोऱ्यात पाणी उपलब्ध नसल्याचे सांगत संबंधित कार्यालयाने पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र अद्यापही दिले नसल्यामुळे या साठवण तलावाला मंजुरी मिळू शकली नाही. दरम्यान, या तलावाच्या मंजुरीसाठी कोण पुढाकार घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
...
पाणी उपलब्धतेच्या प्रमाणपत्राला मंजुरी द्या
पाणी उपलब्धता प्रमाणपत्रासाठी १९६०पूर्वी केरळ राज्यातील डॉ. केरळ राव यांनी घालून दिलेल्या ७५ टक्के विश्वासार्हता ग्राह्य धरून पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र देण्याची चुकीची पद्धत कालबाह्य ठरवली. प्रत्येक पाच वर्षांत होणाऱ्या एका वर्षातील सर्वाधिक होणाऱ्या पावसाच्या पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन गेली अनेक वर्षे पाणी उपलब्धतेच्या प्रमाणपत्रासाठी अडकून पडलेल्या या बुट्टेनाथ साठवण तलावाला तातडीने पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र देऊन या साठवण तलावाला तातडीने मंजुरी देण्यात यावी. पुढील काळात वाण उपखोऱ्यातून वाहून जाणाऱ्या शेकडो दशलक्ष घनमीटर पाण्याची साठवणूक करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांनी केली आहे.