बीड : शुक्रवारी बीडमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी बसवर दगडफेक करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणून जनजीवन सुरळीत केले.
या दगडफेक प्रकरणी पोलिसांनी शनिवारी 31 जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान या प्रकरणातील 100 ते 103 जणांवर कारवाई होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पत्रकारपरिषदेत दिली. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून दगडफेक करणाऱ्यांचा शोध सुरू आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करावे,असे आवाहन देखील पोद्दार यांनी केले. तसेच यापुढे जिल्ह्यात मोर्चा व आंदोलनाला परवानगी दिली जाणार नाही. अशी माहिती पोलीस अधीक्षक यांनी पत्रकारपरिषदेत दिली यावेळी अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, पोनि भारत राऊत हे उपस्थित होते.