केज : तालक्यातील आनंदगाव सारणी येथील विधवा महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी सुग्रीव ज्ञानोबा सोनवणे आणि अशोक रघुनाथ सोनवणे या दोघांना धारूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.आर. मोकाशी यांनी सहा महिने सक्तमजुरी आणि सात हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.
९ मार्च २०१२ रोजी आनंदगाव सारणी येथील विधवा पीडिता दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास माजलागाव येथे स्वयंपाकास जाण्यासाठी आनंदगाव फाटा येथे थांबली होती. यावेळी आरोपी सुग्रीव व अशोक या दोघांनी तिला माजलगावला सोडतो म्हणून त्यांच्या रिक्षात बसविले. तेलगावरोडने घाट संपताच दोघांनी संधी साधून सदर महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी धारूर पोलिसांत गुन्हा नोंद झाला होता. बी.बी. राठोड यांनी या गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र सादर केले होते. याप्रकरणाची सुनावणी प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एस.आर.
मोकाशे यांच्या न्यायालयासमोर झाली. समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे न्या. मोकाशे यांनी दोन्ही आरोपींना दोषी ठरवित सहा महिने सक्तमजुरी आणि प्रत्येकी ७ हजार रुपए दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच, दंडाची संपूर्ण रक्कम पिडीतेला देण्याबाबतही आदेशीत करण्यात आले. सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अॅड. एस. एस. देशपांडे यांनी काम पाहिले.