केज : शहरातील मंगळवार पेठेच्या कॉर्नरवरील स्वामी समर्थ मठाच्या कमानीवर गणेश मंडळाचे बॅनर लावण्यावरून दोन गणेश मंडळाच्या गटात रविवारी रात्री वाद होऊन मारामारी झाली. यात दोन्ही गटातील युवक जखमी झाले असून, केज पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या १६ जणांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
केज शहरातील मंगळवार पेठतील कॉर्नरवर स्वामी समर्थ यांच्या मठाच्या नावाची कमान आहे. कमानीवर एका गणेश मंडळाने बॅनर लावले होते. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून येथे आम्ही बॅनर लावत असताना तुम्ही गणेशोत्सवाचे बॅनर लावले कसे असे म्हणत दोन गणेश मंडळांचे कार्यकर्ते रविवारी रात्री समोरासमोर आले. दोन्ही गणेश मंडळांतील कार्यकर्त्यांत बॅनर लावण्यावरुन व लावलेले बॅनर काढण्यावरुन सुरुवातीस शाब्दिक चकमक उडाली. नंतर याचे पर्यावसान मारामारीमध्ये झाले.
कार्यकर्त्यांनी एकमेकांना फायटर, काठ्या, दगडाने मारहाण केली. यात दोन्ही गणेश मंडळांच्या दोन कार्यकर्त्यांचे डोके फुटले. या प्रकरणी समीर शामराव गुंड यांच्या तक्रारीवरुन चदं्रकांत लोंढे, अशोक लोंढे, रवी लोंढे, पोपट लोंढे, राहुल गोरे, विकी लोंढे, संदीप लोंढे, संतोष लोंढे, गणू लोंढे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसरीकडे संदीप विष्णू लोंढे यांच्या तक्रारीवरुन समीर शामराव गुंड, प्रशांत राजेभाऊ गुंड, अशिष बाळासाहेब गुंड, सुरज दिलीपराव गुंड, विशाल संदिपान गुंड, अतुल अभिमान गुंड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दोन्ही गटातील आरोपींना सोमवारी केज न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपीकडे फायटर आदी साहित्य सापडल्याचे पोउपनि शामकुमार डोंगरे म्हणाले.