दीपक नाईकवाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
केज : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या फलोत्पादन खात्याच्या ताब्यात असलेल्या ३२ एकर जमिनीवर अधिकारी वर्गाच्या दुर्लक्षित कारभारामुळे अतिक्रमण केले जात आहे. फलोत्पादन खात्याच्या जमिनीचा वापर होत नसल्याने, फलोत्पादन खात्याच्या जागेचा वापर अवैध कामांसाठी केला जात असल्याचे दिसत आहे.
केज शहरातील मध्यवर्ती भागातील सर्व्हे नंबर २,३,४,६,१०४ मधील ३२ एकर जमीन शासनाने सन १९५८ साली तालुका बीज गुणन केंद्र चालू करण्यासाठी जमीन संपादित केली होती. या ठिकाणी मोसंबी, लिंबू, जांब, चिकू आदी फळझाडांची लागवड करण्यात येऊन, सुधारित जातीच्या रोपाची निर्मिती करून, शेतकऱ्यांना त्याची विक्री केली जात असे. फलोत्पादन खात्यासाठी संपादित केलेल्या जमिनीमध्ये फळबाग आदींसह रोपवाटिका १९९३ पर्यंत चालू होती. मात्र, १९९५ नंतर फलोत्पादन विभागाचे दुर्लक्ष झाल्याने चोहोबाजूने बांधलेली सुरक्षा भिंत पाडून फलोत्पादनाच्या जागेत अतिक्रमण करण्यास सुरुवात झाली. फलोत्पादनाच्या जागेत अतिक्रमण होत असतानाही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. परिणामी, फलोत्पादनाच्या जागेला अतिक्रमणाने विळखा घातला आहे.
केज शहरातून जात असलेल्या अंबेजोगाई बीड राष्ट्रीय महामार्ग लगत फलोत्पादनची केजडी नदीच्या पूलपासून ते कानडी रस्त्याच्या लागतच्या क्षेत्रावर अतिक्रमण करण्यात आले आहे. फलोत्पादनाच्या जागेत वाहनांची पार्किंगसह अवैध व्यवसाय केले जात असतानाही, याकडे अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. सध्या या जागेत बी.एस. फार्म व कृषी चिकित्सालयासाठी शेड करण्यात आले. मात्र, ते चालविले जात नसल्याने खासगी लोकांना रान मोकळे झाले आहे.