लोकमत न्यूज नेटवर्ककेज : येथे काढलेल्या निषेध रॅलीतील काही युवकांनी आ.संगीता ठोंबरे यांच्या निवासस्थान व संपर्क कार्यालयावर दगडफेक केली. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केल्यामुळे अनर्थ टळला.
सकाळी ११ वाजता निषेध रॅली शिवाजी चौकातून निघून मोंढा, कानडी चौक, बस स्थानक, मंगळवार मार्गे डॉ.आंबेडकर चौकात गेली. त्याठीकाणी या रॅलीचे रुपांतर जाहीर सभेत झाले. निषेधाच्या घोषणा देत निघालेली रॅली आ. ठोंबरे यांच्या बंगल्यासमोर येताच काही कार्यककर्त्यांनी त्यांच्या घरावर आणि संपर्क कार्यालयावर दगडफेक केली. त्यामुळे काही वेळ गोंधळ उडाला होता. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनावरून तालुक्यातील रिपाइं, भारिप बहुजन महासंघ, शेकाप आणि संभाजी ब्रिगेडने याघटनेचा निषेध करुन केज बंदला पाठिंबा दिला. यामध्ये भारिपचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब मस्के, रिपाईचे शहराध्यक्ष भास्कर मस्के, गौतम बचुटे, दिलीप बनसोडे, शेखर सिरसट, लखन हजारे, गोपीनाथ ईनकर, रमेश लांडगे, विजय भांगे, अजय भांगे, सुभाष सोनवणे, बाबा मस्केसह सहभागी झाले होते.
कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या असून त्यांच्यावर कारवाई करू नका, असे पोलिसांना सांगितल्याचे आ.संगीता ठोंबरे यांनी सांगितले. तर पो.नि. शिरीष हुंबे म्हणाले, आमदारांच्या घरावर दगडफेक झाली नाही. केवळ आरडाओरडा झाला होता, असे सांगितले.