जनहिताचे निर्णय रद्द करण्याचा सपाटा; ९० दिवसानंतरही राज्यकारभार सुरळीत नाही: अजित पवार
By अनिल लगड | Published: September 17, 2022 05:37 PM2022-09-17T17:37:05+5:302022-09-17T17:37:36+5:30
राज्यात आमचे सरकार असते तर वेदांत प्रकल्प आम्ही राज्याबाहेर जाऊ दिला नसता.
बीड : राज्यातील महाविकास आघाडी सरकार राज्याला प्रगतीपथाकडे घेऊन जात असताना हे सरकार पाडण्याची महापाप भाजपने केले. आघाडी सरकारने राज्याच्या हिताचे घेतलेले निर्णय रद्द करण्याचा सपाटा शिंदे सरकारने सुरू केला आहे. वेदांत प्रकल्पाला पर्यावरणाचा दृष्टीने चांगले वातावरण असताना शिंदे-फडणवीस सरकारने दिल्लीच्या इशा-यावर हा प्रकल्प महाराष्ट्रबाहेर घालवला. त्यामुळे राज्यातील लाखो तरुणांचा रोजगार गेला, अशी टीका राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माजलगाव येथे केली.
माजलगाव येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन व स्व.सुंदरराव सोळंके जयंतीनिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात अजित पवार बोलत होते. आमदार प्रकाश सोळंके यांनी या कार्यक़्रमाचे आयोजन केले होते. पवार यांनी स्व. सोळंके यांनी त्याकाळात केलेल्या विकास कामांचा गौरव केला. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर येऊन ९० दिवस झाले आहेत. तरीही राज्याच्या कारभार सुरळीत झालेला नाही. महाविकास आघाडी सरकारने घेतलेले जनहिताचे निर्णय हे सरकार रद्द करीत आहे. राज्यात आमचे सरकार असते तर वेदांत प्रकल्प आम्ही राज्याबाहेर जाऊ दिला नसता. हा प्रकल्प बाहेर गेल्याने तरुणांचा रोजगार हिरावून घेण्याचे महापाप या सरकारने केले आहे. १५ जुलै रोजी बैठकीत हा निर्णय झाला. यावेळी आम्ही कोणी मंत्री नव्हतो, असेही पवार म्हणाले.
अतिवृष्टी, पीकविम्याच्या पैशाचे काय झाले?
राज्यात अतिवृष्टी आहे. पाणी वाहून गेलं आहे. शेतकरी अडचणीत आहे. पीक विमा मिळत नाही. जो मुलगा नोकरी मागायला येतो. त्याच्यावर लाठीहल्ला करता. अजून पैसे शेतक-यांना पैसे आले नाहीत. याचे उत्तर द्या, असे आवाहनही पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केले.