बीड : स्थानिक गुन्हे शाखेने तीन गावठी कट्टे व सात जीवंत काडतूस जप्त केले आहेत. तसेच एका अट्टल गुन्हेगारासह एजंट व खरेदी करणाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई बुधवारी दुपारी बीड शहरात करण्यात आली.
सुयोग उर्फ छोट्या मच्छिंद्र प्रधान (रा.जिजामात चौक, बीड), सागर प्रकाश मोरे (वय २२ रा.जिजाऊ नगर, बीड), वैभव संजय वराट (वय २१ रा.स्वराज्य नगर, बीड) व शहानवाज उर्फ शहानु अजिज शेख (रा.अजमेर नगर, बालेपीर बीड) असे आरोपींचे नाव आहेत. यातील छोट्या हा फरार असून इतर तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. सागर व वैभव हे दोघे धानोर रोड परिसरात गावठी कट्टा बाळगून उभा असल्याची माहिती एलसीबीचे उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांना मिळाली होती. त्यांनी सापळा रचून या दोघांना पकडले. पोलिसांना पाहून वैभवचा पळून जाण्याचा प्रयत्नही अपयशी ठरला. त्यानंतर त्यांनी एक कट्टा हा शहानुला विक्री केल्याचे सांगितले. त्याला पोलिस पेट्रोलपंप समोरून बेड्या ठोकल्या. या तिघांकडून तीन गावठी कट्टे आणि सात जीवंत काडतूस पकडले. उपनिरीक्षक खटावकर यांच्या फिर्यादीवरून या चौघांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अपर अधीक्षक सचिन पांडकर, पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, मनोज वाघ, प्रसाद कदम, देविदास जमदाडे, विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, सचिन आंधळे, नारायण कोरडे, विकी सुरवसे, अशोक कदम आदींनी केली.