लोकमत न्यूज नेटवर्कबीड : तालुक्यातील वंजारवाडी शिवारात बीड ग्रामीण पोलीसांना जळालेल्या अवस्थेत एक कार शनिवारी आढळून आली . दरम्यान या कारच्या मालकाचा शोध घेतला असता तो सोमवारपासून मिसिंग असल्याची माहिती पोलिसांना कळाली. गाडी जळालेल्या अवस्थेत मिळाली आहे मात्र, गाडीच्या मालक त्या ठिकाणी नसल्यामुळे घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान याप्रकरणी बीड ग्रामीण व मिसिंगचा गुन्हा केज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.वंजारवाडी शिवारात बीड ग्रामीणचे सपोनि सुजित व इतर कर्मचारी गुरुवारी पाहणी करत होते. त्यावेळी त्यांना जळालेल्या अवस्थेत एक कार सापडली. याविषयी अधिक तपास केला असता केज तालुक्यातील पिसेगाव येथील रहिवासी विकास नेहरकर याची असल्याचे समजले. त्यानंतर माहिती घेतली असता विकास हा रविवारपासून मिसिंग असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर विकास याच्या आईच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाडी जळालेल्या अवस्थेत सापडल्यामुळे यामध्ये घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा तपास केज पोलीस ठाण्याचे पोउपनि मारुती मुंडे हे करत आहे. दरम्यान, शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोनि भारत राऊत व सपोनि सुजित बडे यांनी घटनास्थळी भेट दिली.
जळालेल्या अवस्थेत सापडली कार; घातपाताचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 12:17 AM