बीड : शहरातील अनेक भागांमध्ये उघड्यावरच कचरा टाकला जात आहे. काही ठिकाणी दोन ते तीन दिवस घंटागाडीचा पत्ता नसतो. त्यामुळे कचऱ्याचे ढिगारे दिसून येत आहेत. नगरपालिकेने स्वच्छता मोहीम राबवून कचऱ्याचे ढिगारे उचलावेत तसेच घंटागाडी वेळेवर सोडाव्यात, अशी मागणी होत आहे.
निवाऱ्याची गरज
वडवणी : तालुका व परिसरात अनेक महत्त्वाच्या ठिकाणाहून प्रवास करण्यासाठी तासन्तास उघड्यावर ताटकळत प्रवासी उभे राहत आहेत. प्रवाशांमधून अनेकवेळा निवारा बांधण्याची मागणी होत आहे. परंतु याकडे अद्याप संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे. ऊन, वाऱ्याचा त्रास प्रवाशांना होत आहे.
बाजारतळावर सुविधा वाढवण्याची मागणी
नेकनूर : बीड तालुक्यातील नेकनूर येथील आठवडी बाजारतळावर मूलभूत सुविधा वाढवण्याची मागणी केली जात आहे. येथे येणाऱ्या व्यापारी व बाजारकरूंना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
वाहतुकीस अडथळा
पाटोदा : तालुक्यातील ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या रस्त्यावर काटेरी वेल, झाडे वाहतुकीस अडथळा निर्माण करत आहेत. समोरून येणारे वाहन किंवा पादचारी दिसत नाही. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील काटेरी झाडे तोडण्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे.
बंदोबस्ताची मागणी
केज : केज पोलीस ठाणे हद्दीत चोरीचे व दरोड्याचे प्रमाण मागील काही महिन्यांत वाढले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रात्री गस्त वाढविण्याची मागणी होत असून, दाखल गुन्ह्यांचा छडा तातडीने लावावा व चोरट्यांना ताब्यात घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
अंधारामुळे अडचण
धारूर : शहरातील अनेक विद्युत खांबावर दिवे नसल्याने या परिसरातील रहिवासी तसेच येणाऱ्या - जाणाऱ्या नागरिकांना रात्रीच्या वेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सर्व खांबांवर नगरपालिकेने तात्काळ विद्युत दिव्यांची व्यवस्था करुन अंधार दूर करण्याची मागणी होत आहे.