बीड : मागील आठ दिवसांपासून तालुक्यातील अंथरवन पिंपरी येथे अज्ञात रोगाने जनावरे दगावत आहेत. औरंगाबाद येथून आलेल्या विभागीय पथकाने शुक्रवारी गावात पाहणी केली. याच विषयाच्या संदर्भात गुरुवारी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी पशुसंवर्धन अधिकाऱ्यास धक्काबुक्की केली होती. त्यांच्याविरोधात गुरुवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अंथरवन पिंपरी येथे डॉक्टरांचे पथक तैनात असून जनावरांना लसीकरण व इतर उपचार सुरू असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
अंथरवन पिंपरी येथे मागील काही दिवसात अज्ञात रोगामुळे जवळपास ३४ जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये गाय,म्हैस यासह शेळी व कोकरांचा समावेश आहे. मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांचे शवविच्छेदन केल्यानंतर सॅम्पल औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. शुक्रवारी उपचार सुरु असताना एक गाय व दोन शेळ््या दगावल्याची माहिती आहे.
शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल यासंदर्भात गुरुवारी पशुसंवर्धन अधिकारी डॉ.संतोष पालवे यांना शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली होती. याप्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा २ वाजण्याच्या सुमारास शिवसंग्रामचे कार्यकर्ते नवनाथ परभाळे, विजय सुपेकर यांच्यासह इतर १० ते १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.