बीड : जिल्ह्यातील अवैध वाळूसाठा व वाहतुकीवरील कारवाईनंतर, ठेकेदार व वाहतूकदारांनी हप्तेखोर अधिकाऱ्यांच्या ‘रेटकार्ड’सह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. याप्रकरणी विधानसभेत चर्चा झाल्यानंतर चौकशी करण्याचे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आस्तिकुमार पाण्डेय व पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी गुरुवारी संबंधित वाळू ठेकेदार व वाहतूकदारांचे तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांचे इन कॅमेरा जबाब नोंदवले.
गेवराई तालुक्यातील राजापूर, गंगावाडी येथील अवैध वाळू साठ्यावर जिल्हाधिकारी आस्तिकुमार पाण्डेय यांनी कारवाई केली होती. त्यानंतर अवैध साठा व वाहतूक रोखण्यासाठी गोदा पट्टा तसेच इतर परिसरातील संबंधित महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी व वाळू वाहतूकदार व ठेकेदार यांची बैठक घेतली होती. यामध्ये जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय व पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी अवैध वाहतूक व साठे थांबवण्याचे सक्त आदेश प्रशासनास दिले व ठेकेदार वाहतूकदारांना नियमानुसार महसूल भरुन वाळू वाहतूक करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण लागले. नियमानुसार पावती घेऊन जरी वाळू वाहतूक केली तरी देखील हप्ते द्यावे लागतात, असे निवेदन ४७ वाळू वाहतूकदार व ठेकेदार यांनी आपल्या स्वक्षरीसह दिले. यामध्ये पोलीस व महसूलमधील कोणत्या विभागाला किती हप्ते दिले जातात याचे रेटकार्ड देखील जोडलेले होते. तसेच आ. विनायक मेटे यांनी विधानसभेत याच विषयात लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न विचारले होते. तसेच कोणते अधिकारी हप्ते घेतात, त्यांची नावे दिली होती. त्यानुसार विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून अहवाल पाठवण्याचे निर्देश बीडचे जिल्हाधिकारी यांना दिले होते.
त्यानुसार गुरुवारी पोलीस अधीक्षक यांनी निवेदन दिलेल्या ४७ पैकी १२ जणांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यापैकी ८ जणांनी हजर राहून ११ वाजण्याच्या सुमारास जबाब नोंदवले, हे जबाब इन कॅमेरा नोंदवण्यात आले आहेत. तसेच जिल्हाधिकार्यांनीही याच संदर्भात जबाब नोंदवले आहेत. त्यानुसार अहवाल तयार करुन विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित अधिकारी व कर्मचारी दोषी आढळले तर कारवाई केली जाणार आहे.
ठेकेदार आणि वाहतूकदारांनी दिले पुरावे जबाब नोंदविण्यासाठी बोलावलेल्या वाळू वाहतूकदार व ठेकेदारांना आपल्या जबाबासोबतच, हप्ते कसे व कोणत्या अधिकाऱ्याला दिले जायचे याचे पुरावे दिल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे वाळू प्रकरणात कोणत्या अधिकाऱ्यांवर कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बीड जिल्हाधिकारी म्हणून सुनील केंद्रेकर कार्यरत होते. जिल्ह्यातील विविध विषयांच्यादर्भात त्यांचा अभ्यास आहे. अवैध वाळू साठा व वाहतूकदारांच्या निवेदनानंतर तसेच अधिवेशनातील लक्षवेधीनंतर केंद्रेकर यांनी चौकशी करुन अहवाल मागविले आहेत. ते या प्रकरणात काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
दोषींवर योग्य कारवाई या प्रकरणाचा सर्व तपास मी स्वत: करीत आहे. गुरुवारी १२ जणांना जबाब नोंदविण्यासाठी बोलावले होते, त्यापैकी ८ जण हजर झाले व त्यांचा इन कॅमेरा जबाब नोंदवला आहेत, तसेच या प्रकरणात ज्या अधिकाऱ्यांची नावे आली आहे, अशा सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे. जे दोषी आढळतील त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल. - जी. श्रीधर, पोलीस अधीक्षक