- सखाराम शिंदेगेवराई : तालुक्यातील शहाजाणपुर चकला येथील सिंदफना नदी पात्रात अवैध वाळू उपसा केलेल्या खड्यात चार बालकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी तांदळवाडी येथील चार वाळू माफियांच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा गेवराई पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी फरार आहेत.
तालुक्यातील शहाजानपुर चकला येथील बबलु गुणाजी वक्ते,गणेश बाबुराव इनकर, आकाश राम सोनवणे व अमोल संजय कोळेकर यांचे मृतदेह सिंदफना नदी पात्रातील वाळू उपस्याने पडलेल्या खड्यात आढळून आले होते. या प्रकरणी वाळू माफियांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणीकरून नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता.
या प्रकरणी गेवराई व बीडचे महसूल अधिकारी तसेच गेवराई, बीड ग्रामीण ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येवून वाळू उपसाप्रकरणी कारवाई करू असे लेखी आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतले होते. हे प्रकरण जिल्हात चांगलेच गाजले होते. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले होते. या प्रकरणी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशासनास सूचना दिल्या होती. जिल्हाधिकारी यांनी तातडीने बैठक घेत कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर आज गेवराई पोलिस ठाण्यात सदर प्रकरणी पांडुरंग चोरमले, विलास निर्मळ, संदिप निर्मळ, अर्जुन कोळेकर ( सर्व राहणार तांदळवाडी ) यांच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सर्व आरोपी फरार आहेत. पुढील तपास सपोनि संदिप काळे हे करित आहेत.