: शहराजवळील पिसेगाव येथील कोविड सेंटरला भेट देऊन शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी पाहणी केली.यावेळी दुपारी ३ वाजेपर्यंत जेवण मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे मुळूक यांनी सांगितले.
केज येथे सध्या दोन कोविड सेंटर सुरू असून, पिसेगाव येथील सेंटरवर १६८ रुग्ण उपचार घेत आहेत तर शारदा इंग्लिश स्कूल सेंटरवर १३९ रुग्ण असे एकूण ३०७ रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांना सकाळी ९ वाजता अल्पोपहार, दुपारी १ वाजता जेवण व संध्याकाळी ७ ते ८ वाजता जेवण देणे अपेक्षित आहे; मात्र या दोन्ही कोविड सेंटरवर मागील आठवड्यापासून वेळेवर जेवण व नाष्टा मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. रविवारी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन मुळूक यांनी या दोन्ही कोविड सेंटरला भेट देऊन परिस्थितीची पाहणी करून थेट रुग्णांशी संवाद साधला. यावेळी रुग्णांनी आपल्या व्यथा बोलून दाखवल्या. शारदा इंग्लिश स्कूलवरील कोविड सेंटरवर देखील ३ वाजेपर्यंत जेवण मिळत नसल्याने येथील रुग्ण आता आजारापेक्षा जेवण न मिळाल्यामुळे क्षीण होत आहेत.
डॉक्टर व त्यांचे सर्व कर्मचारी त्यांची सेवा चोख बजावत आहेत; मात्र केवळ जेवणाच्या विस्कळीतपणामुळे या सेंटरवर असुविधा निर्माण होत आहेत. याबाबत संबंधित कंत्राटदाराला रुग्णांना वेळेवर जेवण व नाष्टा देण्याबाबत सूचना करावी, असे आम्ही तहसीलदारांना कळवले आहे. रुग्णांना उपचारासाठी आवश्यक औषधी आमच्याकडे पुरेशी उपलब्ध आहेत. आम्हालाही स्टाफ कमी पडत असला तरीही यातून मार्ग काढून उपचार देत असल्याचे कोविड सेंटरचे प्रमुख डॉ.दत्तात्रय चाटे यांनी बोलताना सांगितले.