राफेल घोटाळा दडपडण्यासाठीच सीबीआय संचालक सक्तीच्या रजेवर : मल्लिकार्जुन खर्गे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 07:50 PM2018-11-01T19:50:45+5:302018-11-01T19:59:27+5:30
काँग्रेस पक्षाची जनसंघर्ष यात्रा आज अंबाजोगाई येथे आली होती. यावेळी खा. खर्गे बोलत होते.
अंबाजोगाई (बीड ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल घोटाळा आपल्या अंगावर येण्याची भीती असल्यानेच तो दडपण्यासाठी सीबीआयच्या संचालकांना रात्रीतून सक्तीच्या रजेवर पाठवले. आजपर्यंतच्या कोणत्याही पंतप्रधानांनी असे गैरकृत्य केले नव्हते ते मोदींनी केले. असा घणाघाती आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.
काँग्रेस पक्षाची जनसंघर्ष यात्रा आज अंबाजोगाई येथे आली होती. यावेळी खा. खर्गे बोलत होते. यावेळी व्यासपिठावर काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी खा. रजनीताई पाटील, माजी मंत्री सुरेश नवले, अशोकराव पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी आ. सिराज देशमुख, डॉ. नारायण मुंडे, टी. पी. मुंडे, नगराध्यक्षा रचना मोदी, केजचे नगराध्यक्ष आदित्य पाटील, जिल्हा परिषदेचे सभापती राजेसाहेब देशमुख, डॉ. अंजली घाडगे, संजय दौंड व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार खर्गे पुढे म्हणाले की, केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता जनतेची घोर फसवणूक करत आहे. जनतेवर सुरू असलेल्या अन्यायाच्या विरोधातच काँग्रसेने जनसंघर्ष यात्रा सुरू केली आहे. केंद्र व राज्यातील सरकार हटविण्यासाठी काँग्रेसला ताकद द्या. असे आवाहन त्यांनी केले. तसेच राफेल घोटाळा आपल्या अंगलट येऊ नये म्हणून सीबीआय सारख्या महत्त्वपूर्ण संस्थेत पंतप्रधानांनी ढवळाढवळ केली आणि तेथील संचालकांना सक्तीच्या रजेवर पाठविले अशी जोरदार टीका त्यांनी यावेळी केली.